मुंबई : मुंबई - पुणे महामार्गावर दरड कोसळून होणारे अपघात टाळण्याकरिता आडोशी व खंडाळा येथील बोगद्यांना कृत्रिम बोगदे जोडून त्यांची लांबी वाढवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या उच्चाधिकार बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर स्फोटकांचा वापर न करता सर्व कामे कामगारांची मदत घेऊन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.या महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना वरचेवर घडू लागल्याने आडोशी येथील बोगद्याची लांबी १०० मीटरने तर खंडाळा येथील बोगद्याची लांबी ३०० मीटरने वाढवण्यात येणार आहे. प्रीकास्ट पद्धतीने हे बोगदे तयार करून तेथे आणून बसवण्यात येणार आहेत. वारंवार दरड कोसळण्यामुळे अनेक दगड सैल झाले आहेत, ते स्फोट करून पाडण्याचा पर्याय असला तरी त्यामुळे वरील भागातील काही शाळा व कच्च्या घरांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे कामगारांच्या मदतीने हे काम केले जाणार आहे.या बैठकीस जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे संचालक डॉ. मकरंद बोडस, उपसंचालक सरकार, आयआयटीचे प्रा. सिंग तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
आडोशी, खंडाळा बोगद्यांची लांबी वाढवणार
By admin | Published: August 04, 2015 1:28 AM