ॲड. नार्वेकर भाजपचे विधानसभाध्यक्षपदाचे उमेदवार, मोठ्या धक्क्यानंतर आता आणखी धक्के!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 09:13 AM2022-07-02T09:13:10+5:302022-07-02T09:14:17+5:30
नार्वेकर यांनी अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेते उपस्थित होते.
मुंबई : संपूर्ण देशाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, असे समीकरण महाराष्ट्रात आल्यानंतर आता भाजपने आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पाेहाेचलेले ॲड. राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.
नार्वेकर यांनी अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.
४५ वर्षीय नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले. पूर्वी ते शिवसेनेमध्ये होते. नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. २०१४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढविली होती, पण ते पराभूत झाले. त्याचवर्षी त्यांची राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काहीच दिवस आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व कुलाबा मतदारसंघाचे आमदार झाले.
सासरे सभापती,
जावई अध्यक्ष
- भाजप-शिंदे गटाकडील संख्याबळ लक्षात घेता, नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जाते.
- या निमित्ताने एक वेगळाच योगायोग साधला जाणार आहे. नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक- निंबाळकर हे महाराष्ट विधान परिषदेचे सभापती आहेत.
- त्यामुळे सासरे विधान परिषदेचे सभापती, तर जावई विधानसभेचे अध्यक्ष असा अपूर्व योग जुळून येऊ शकतो. निंबाळकर यांच्या कन्या सरोजिनी या नार्वेकर यांच्या पत्नी आहेत.
भूकंपाचे धक्के मंत्रिमंडळ रचनेपर्यंतही पोहोचणार?
राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी देत भारतीय जनता पार्टीने जे धक्कातंत्र अवलंबिले, ते मंत्रिपदांची संधी देतानाही वापरले जाईल, असे आता म्हटले जात आहे. त्यामुळे पक्षातील एक-दोन दिग्गज, प्रस्थापितांना विश्रांती दिली जाऊ शकते. मंत्रिमंडळात हमखास समावेश होणार म्हणून ज्यांची नावे माध्यमांतून दिली जात आहेत, त्यांना भूकंपाचा तडाखा बसू शकतो. विशेषत: नार्वेकर यांना अनपेक्षितरित्या संधी दिली गेल्याने प्रस्थापितांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.