मुंबई : शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाला राज्यात बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्या अंतर्गत दोन लाख शेतकऱ्यांना पिकांच्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. एक कोटी सहा लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना आगामी पाच वर्षांत बियाण्यांचा पुरवठा कसा केला जाईल या बाबतचा आराखडा आधीच जाहीर केला जाणार आहे. शेतकऱ्यांना चार बैलांचे काम करू शकणारे छोटे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, थ्रेशर, तसेच भातासाठी ट्रान्सप्लांटर, रिपर, ऊसासाठी पाचट कुट्टी यंत्र, फळबागेसाठी स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर इ. यंत्र खरेदीसाठी वर्षाच्या सुरु वातीपासून शासन अनुदान उपलब्ध करून देणार आहे. ही सर्व यंत्रे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीने खरेदी करण्याची मुभा शासन देणार आहे आणि त्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार क्र मांक संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी ही माहिती दिली. राज्यातील शेतजमिनींची आरोग्य पत्रिका तयार करून एक कोटी सहा लाख शेतकऱ्यांना वितरीत केल्या आहेत. सदर आरोग्य पत्रिकांच्या आधारे शेतकऱ्याने पिकांकरिता आवश्यक मात्रेतच खते द्यावीत व उत्पादन खर्चामध्ये बचत करावी यासाठी कृषी सहाय्यक मार्गदर्शन करणार आहेत. (विशेष प्रतिनिधी) या वर्षी संपूर्ण ‘रोहिणी’ नक्षत्रातील १५ दिवस कृषी विभाग ‘‘उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवडा’’ साजरा करणार आहे. या पंधरवड्यात सर्व कृषी शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावोगावी जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देतील आणि दोन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतील.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान आजपासून
By admin | Published: March 29, 2017 3:23 AM