मुंबई - लोकसभा निवडणूक प्रचाराचा वेग वाढताना दिसत आहे. राजकीय नेते एकमेकांवर टीका करत आहे. भाजपमध्ये जेष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याचा आरोप होत आहे. मोदींच्या काळात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित करण्यात आल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
भाजपकडून अडवाणी यांना डावलले जात असल्याची टीका होत असताना, जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराच्या होर्डिंगवर सुद्धा अडवाणी यांना डावलण्यात आल्याचे पाहायला मिळाले. जालना लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी रामनगर येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रचार कार्यलायचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनच्या ठिकाणी भाजपकडून मोठ-मोठे होर्डिग लावण्यात आले होते. होर्डिंग मध्ये भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या यादीत नेहमी दिसणारे अडवाणी यावेळी कुठेच दिसले नाही.
भाजप कडून १९९१ पासून गांधीनगर येथून लालकृष्ण अडवाणींनी प्रतिनिधित्व केलं आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांच्या जागी अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी नाकारल्याने अडवाणी नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनतर, त्यांनी ब्लॉग लिहून आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली होती.
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी चंद्रपुरात अडवाणी बद्दल केलेलं वक्तव्य आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोदींवर टीका करताना, आमची काळजी करण्यापेक्षा अडवाणींची काळजी घ्या असा सल्ला दिला. यामुळे भाजप मधील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
दानवेंच्या प्रचार होर्डिग मधून लालकृष्ण अडवाणी यांना डावलल्याने राष्ट्रीय पातळीवरच नाही तर स्थानिक कार्यक्रमात सुद्धा अडवाणी यांना डावलले जात तर नाही असा प्रश्न पडत आहे.