पुणे : सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९चा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला. सर्वसाधारण प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रोहन कुंवर मागासवर्गीय प्रवर्गातून, तर मानसी पाटील यांनी मुलींमधून प्रथम क्रमांक पटकावला.
कोर्टाच्या निर्णयानंतर शासनाने भरतीबाबत अध्यादेश प्रसिद्ध केला. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असलेली पदे खुल्या पदांमध्ये रूपांतरित केली. त्यानुसार, ४२० पदांचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी ‘ऑप्टिंग आउट’ मागविले होते. त्यामुळे काही उमेदवारांनी स्वत:हून आपला समावेश या निकालात करू नये, असे आयोगाला कळविले होते. परिणामी, सुधारित निकालामुळे कोणतीही नियुक्ती न मिळता, बाहेर फेकल्या जाणाऱ्या अनेक उमेदवारांचा फायदा झाला आहे. मात्र, पूर्वीच्या निकालात समावेश असणाऱ्या काही उमेदवारांना सुधारित निकालाचा फटका बसला आहे. या उमेदवारांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचे सांगण्यात आले.
उमेदवारांना नेमका लाभ कसा झाला?
- राज्यसेवा २०१९च्या अंतिम निकालातून मिळणारे पद ज्यांना नको आहे, अशा उमेदवारांनी आपली नावे आयोगाला कळवावीत, असे आवाहन केले होते. त्यानुसार, काही उमेदवारांनी आयोगाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला.
- परिणामी, आरक्षण बदलामुळे बाहेर फेकल्यांना या पदांवर नियुक्ती देणे शक्य झाले. काही उमेदवार सध्या शासकीय सेवेत असून, त्यांना पदोन्नती मिळाली. राज्यसेवा २०१९च्या अंतिम निकालातून त्यांना कनिष्ठ स्तरावरील पद मिळाले असते. त्यामुळे ‘ऑप्टिंग आउट’चा अनेकांना फायदा झाला.