शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक आणि त्यांच्या वेगळे झाल्यानंतर ठाकरे गटात प्रवेश करणारे ठाकरे शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे अडचणीत सापडले आहेत. त्यांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले आहे.
अद्वय हिरे यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी रेणुका सूतगिरणीवर साडेसात कोटींचे कर्ज उचलले होते. परंतू, ते न फेडल्याने ही रक्कम ३० कोटींवर गेली होती. यामुळे हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात हिरे यांनी हायकोर्टात जामीनासाठी धाव घेतली होती. परंतू, हायकोर्टाने तो नाकारला आहे.
रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. एप्रिल महिन्यात हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक (Nashik) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव (Maleagaon) शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती.
हे प्रकरण आठ वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असा आरोप यापूर्वी हिरे यांनी केला होता. 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपीने याबाबतचे वृत्त दिले आहे.