लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले. या पार्श्वभूमीवर, मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्कमपणे सोबत आहोत, शिवसेना-भाजपची युती आगामी सर्व निवडणुका जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे-फडणवीस यांच्यात तुलना योग्य नाही, जाहिरातीपेक्षा निवडणुकीचा कौल महत्त्वाचा आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर कौलाचा इतकाच विश्वास असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या, असे आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे यांना दिले.
या जाहिरातीत केलेले जनमताचे दावे, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात केलेली तुलना यावरून दिवसभर वाकयुद्ध रंगले. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उडी घेतली. शिंदे समर्थक मंत्री दीपक केसरकर व शंभूराज देसाई यांनीही भूमिका मांडली.
कानाच्या दुखण्याने फडणवीस अनुपस्थित
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी कोल्हापुरात झाला. त्यानिमित्ताने तपोवन मैदानावर जंगी सभादेखील पार पडली. सभेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावर ‘सततच्या हवाई प्रवासामुळे फडणवीस यांच्या कानाला इजा झाली आहे. हवाई प्रवास करू नका असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असूनही त्यांना दौरा रद्द करावा लागला,’ असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.