मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्यातील विविध भागांतील सुमारे १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुंबईतील घरांची लॉटरी यंदा नसेल. मात्र, मुंबईत गिरणी कामगारांसाठी लवकरच ५ हजार ९० घरांची लॉटरी काढण्यात येईल, असे स्पष्ट केले.
निवडणूक आचारसंहितेपूर्वी म्हाडाच्या कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद यासह गिरणी कामगारांच्या १४,६२१ घरांची सोडतीची जाहिरात आॅगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवारच्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. पुणे मंडळाच्या हद्दीतील २० टक्के कोट्यातील २ हजार घरे, कोकण मंडळाची ५,३०० घरे नाशिक मंडळाची ९२, औरंगाबाद १४८, अमरावती १२००, नागपूर ८९१ तर मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी ५ हजार ९० अशा १४,६२१ घरांचा या सोडतीत समावेश आहे.
दरम्यान, रखडलेल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास म्हाडा स्वत:च करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, तर वसाहत सेवाशुल्क अहवाल दहा दिवसांत जाहीर होईल. गेल्या दहा वर्षांत मुंबईत म्हाडा फक्त १४,१५५ घरे देऊ शकली. आता आॅगस्टच्या लॉटरीत मुंबईच्या घरांचा उल्लेख नाही. यामुळे मुंबईकराच्या पदरी यंदा निराशाच येणार आहे.पत्रकार, म्हाडा कर्मचाऱ्यांच्या घराचा निर्णय पुढील बैठकीतमुंबईतील पत्रकार, म्हाडा कर्मचारी, सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला घरांचा प्रश्न म्हाडा प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत सोडविला जाईल. यासाठी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त होईल. यात उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांचा समावेश असेल. या समितीच्या माध्यमातून घरांसाठी जागा कुठे उपलब्ध होऊ शकते? किती घरे उपलब्ध होतील? या सर्व बाबी तपासून प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत यावर निर्णय घेईल, असे सामंत म्हणाले.कुठे किती घरे?नाशिक - ९२, मुंबई - ५,०९० ( फक्त गिरणी कामगारांसाठी), औरंगाबाद -१४२, कोकण - ५,३००, अमरावती -१२००, नागपूर - ८९१, पुणे - २०००