लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फेत शहरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि बेघरांसाठी गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरात गृहप्रकल्प बांधण्यात येणार आहे. त्यासाठी निविदापश्चात आणि निविदापूर्व कामांकरिता तीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यासाठी तीनही सल्लागारांना विभागून काम देण्यात येणार आहे. स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे २०२२ ही योजना राबविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार घरे बांधण्याचे धोरण आहे. त्यामध्ये ईडब्ल्यूएसअंतर्गत रावेत, दिघी, डुडुळगाव, मोशी - बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, वडमुखवाडी, चिखली येथे सुमारे १२ हेक्टर जागेवर आरक्षण आहे. तर एचडीएच अंतर्गत पिंपरीत २ एकर २८ गुंठे जागेवर आणि आकुर्डीत १ हेक्टर ७८ गुंठे जागेवर आरक्षण आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या आरक्षित जागांवर तब्बल ९ हजार ४५८ घरे बांधणे शक्य होणार आहे. या जागांवर १२ ते १४ मजली इमारती बांधण्यात येणार आहे. अडीच एफएसआय वापरून त्याचे आराखडे, नकाशे तयार करण्यात येणार आहेत. आर्किटेक्ट संस्थांची केली छाननीआर्किटेक्ट सल्लागारासाठी प्रकल्प खर्चाच्या ०.९० टक्के दराने व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारासाठी १.४५ टक्के दराने काम करण्यास इच्छुक असलेल्या सल्लागारांसाठी आर्किटेक्ट, संस्था यांची छाननी केली आहे. त्यानुसार सहशहर अभियंत्यांच्या शिफारशीने या तीन संस्थांना काम विभागून देण्यात येणार आहे. या प्रस्तावास मान्यता दिली आहे, असे सावळे यांनी सांगितले.
‘पंतप्रधान आवास’साठी सल्लागार
By admin | Published: June 08, 2017 1:27 AM