Advocate Gunaratna Sadavarte Criticized Raj Thackeray: खळ्ळ खट्याक वगैरे काही चालणार नाही. एक रेतीचा कण जरी दुसऱ्यावर बेकायदेशीर मारला आणि खरी कायदेशीर कारवाई झाली, तर कोणताही राज ठाकरे बचावाला येत नाही. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. राज ठाकरेंची आताची भाषा ही हिंदूत्ववादी संघटनांसारखी राहिलेली नाही. राज ठाकरे यांचे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी योगदान काय? खळ्ळ खट्याक हे योगदान आहे का, भाषीय वाद हे योगदान आहे का, प्रांतवाद योगदान आहे का, राज ठाकरे यांचे एवढेच योगदान आहे की, कुठेतरी हच्चा आला एकचे राजकारण करायचे, या शब्दांत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्रातील बँकांमधील व्यवहार तसेच आस्थापनांमध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने होतो की नाही, यावर लक्ष ठेवण्यास सांगितल्याने मनसैनिक चांगलेच सक्रीय झाले आहेत. विविध भागांतील बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेच्या वापरासंदर्भात आढावा घेतानाच तेथील अधिकारी वर्गाला दमदाटी करताना पाहायला मिळत आहेत. यावरूनच वकील गुणरत्न सदावर्ते मनसे विरोधात आक्रमक झाले आहेत.
राज ठाकरे यांनी सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत
राज ठाकरे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांची टोळकी आल्या दिवशी बँका तसेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धुडगूस घालत असतात, ते थांबायला हवे. मी याबाबत मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देणार आहे. अशा टोळक्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तसेच मुंबईसाठी राज ठाकरे यांचे देणे काय आहे, कधी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रकरणात राज ठाकरे दिसतात का, कधी कष्टकऱ्यांच्या प्रकरणात राज ठाकरे दिसतात का, कधी कोणत्या श्रद्धेच्या प्रकरणात राज ठाकरे दिसतात का, राज ठाकरे यांनी सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत बोलणाऱ्या राज ठाकरे यांनी डोक्यातील भिंत आधी तोडावी. अशा प्रकारे गंगेचा अपमान सहन केला जाणार नाही. राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना रामललाचे दर्शन घेऊ देऊ नये, असे सदावर्तेंनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसैनिकांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत धडक देत मोठा राडा केला. बँक मॅनेजरला मराठीत व्यवहार करण्याबाबत निवेदन दिले. तुम्ही मराठी का बोलत नाही? असा जाब मनसैनिकांनी विचारला. याला प्रत्युत्तर देताना बँक मॅनेजरने, तुम्ही इतके आक्रमक का होत आहात?, असा प्रतिसवाल केला. यातून दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये मनसैनिकांनी त्या कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली आणि मॅनेजरच्या कक्षातून बाहेर काढले.