Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. याशिवाय कुणबी नोंदी आणि शिंदे समिती रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. यातच आता विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण होत आहे. विचारांची लढाई विचाराने लढायला हवी आहे. मनोज जरांगे पाटील खालच्या स्तरातून टीका करीत आहेत. सर्वांची लायकी काढत आहेत. आधी पोलिसांना लक्ष्य केले, आता आमदारांच्या जातीवर जाऊन बोलत आहेत. मनोज जरांगे स्वत:ला बॅरिस्टर समजतात की, ॲटर्नी जनरल, अशी विचारणा गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
आतापर्यंत कायदेशीर बाबीमध्ये जरांगे यांना बोलवले गेलेले नाही
आतापर्यंत कायदेशीर बाबीमध्ये मनोज जरांगे यांना बोलवले गेलेले नाही. मनोज जरांगे मग्रुरीतून बोलत आहेत, हुकूमशाहीतून बोलत आहेत. कोणाला मारून आणि गाड्या फोडून आरक्षण मिळत नाही. महाराष्ट्रातील वातावरण खराब केले आहे. मनोज जरांगे यांना कायद्याचे किती ज्ञान आहे, हे पाहण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत सरकारने सोयी-सवलत दिली आहे. पण हे सर्वांचे लायकी काढत निघाले, हे चालणार नाही. बेकायदेशीर आंदोलन करण्याची तरतूद नाही, हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे, अशी टीका सदावर्ते यांनी केली.
दरम्यान, आंदोलन कसे करावे याविषयी नियम आहेत. तोडफोड जाळपोळ करणाऱ्याकडून दंड वसुली केली जाते. जोपर्यंत कायद्याच्या चौकटीत मनोज जरांगे यांना आणत नाहीत तोपर्यंत हे असेच चालू राहणार आहे. मनोज जरांगेच्या बाबतीत डेमोक्रॉसी नाही तर मोबॉक्रॉसी झाली आहे, या शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी निशाणा साधला.