मुंबई : कोरोना संकटामुळे बंद झालेली मुंबईचीलोकल सेवा हळूहळू सुरु करण्यात येत आहे. खासगी सुरक्षारंक्षकांनंतर आता वकिलांसाठी ही सेवा खुली झाली आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरून वकील, त्यांच्याकडील नोंदणीकृत क्लार्क यांना पुढील महिन्याच्या 23 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. न्याय़ालयांमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीक़ृत क्लार्क हे कामाच्या दिवशीच प्रवास करु शकणार आहेत. यासाठी वेळही ठरवून दिली आहे. सकाळी 8 च्या आधी, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर शेवटची लोकल सुरु असेपर्यंत या वकिलांना प्रवास करता येणार आहे.
तसेच कोणतेही कारण असले तरही या वकिलांना गर्दीच्या वेळी प्रवास करता येणार नाही. मासिक पास दिला जाणार नाही. प्रत्येक प्रवासासाठी एका दिशेचे तिकिट घ्यावे लागेल. बार असोसिएशनने दिलेले ओळखपत्र दाखविल्यानंतरच तिकिट दिले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र आणि गोव्य़ाच्या बार असोसिएशन गृहीत धरल्या आहेत. तसेच क्लार्कसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडील नोंदणी लागणार आहे. तिकिट अहस्तांतरणीय राहिल. तसेच हा प्रवास कामासाठीच करता येणार आहे. खासगी कामे, कार्यक्रमांसाठी करता येणार नाही.