सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याचे वकीलपत्र घेण्यासाठी हिंदू विधिज्ञ परिषदेने वकिलांची फौज उभी केली आहे, तशीच फौज पानसरेंच्या कुटुंबियांचे वकीलपत्र घेण्यासाठी व सरकार पक्षाला सहाय्य करण्यासाठी उभी करण्यास शुक्रवारी सांगलीतून सुरुवात झाली.सांगलीतून तब्बल ७० वकिलांनी वकीलपत्र घेतल्याची कागदपत्रे सही करून अॅड. के. डी. शिंदे, अॅड. अजित सूर्यवंशी आणि अॅड. अमित शिंदे यांच्याकडे दिली आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापूर पोलिसांनी सनातन संस्थेचा साधक समीर याला सांगलीतून अटक केली. दोन दिवसांपूर्वी समीरच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून घेण्यासाठी त्यास पुन्हा न्यायालयात उभे केले होते. त्यावेळी समीरच्या बाजूने ‘सनातन’ने ३१ वकील न्यायालयात उभे केले होते.पुरोगामी संघटनांनी पानसरे यांचे कुटुंब व सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला. सांगलीसह राज्यातील सर्व वकील संघटनांशी त्यांनी संपर्क साधून वकीलपत्र घेण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, यवतमाळ, नागपूर, अकोला या जिल्ह्यांतील वकिलांनी पानसरे कुटुंब व शासनातर्फे वकीलपत्र घेणार असल्याची तयारी दर्शविली आहे. किमान तीनशेहून अधिक वकील वकीलपत्र घेतील, असा अंदाज अॅड. शिंदे यांनी व्यक्त केला. जमा होणारी वकीलपत्रे शिंदे कोल्हापुरातील न्यायालयात सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)देशात अनेक हिंदू अतिरेकी संघटना उभ्या राहिल्या आहेत. या देशातील हिंदू असुरक्षित आहेत का, याचे उत्तर संघटनांनी द्यावे, असे आव्हान देत कायद्याच्या चौकटीबाहेर असणाऱ्या सर्वच संघटनांवर बंदी घातली पाहिजे, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ‘सनातन’वाल्यांचा संबंध उघड केला आहे. पोलीस त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन का करीत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरही सहभागीभारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही शुक्रवारी सांगलीत आल्यानंतर वकीलपत्रावर सही करून ते अॅड. शिंंदे यांच्याकडे दिले.
वकीलपत्रासाठी राज्यातून वकील सरसावले
By admin | Published: September 26, 2015 1:39 AM