कोल्हापूर : कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या मागणीकडे कानाडोळा करणारे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि.१२) व शनिवारी (दि.१३) दोन दिवस ‘काम बंद’ आंदोलन करून महालोक अदालतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज, शुक्रवारी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांनी घेतला. तसेच येणाऱ्या काळात उच्च न्यायालयासमोर आमरण उपोषण, कोल्हापूर ते मुंबई लाँग मार्च, जेलभरो, वकिली सनद रद्दसाठी मागणी अर्ज करणे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कोणत्याही कार्यक्रमाला निमंत्रित करू नये तसेच प्रसंगी आत्मदहन करण्याचे महत्त्वपूर्ण ठरावही यावेळी करण्यात आले. हे ठराव लवकरच संबंधितांकडे पाठविण्यात येणार आहेत.कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात कोल्हापुरात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील परिषद आयोजित केली होती. प्रमुख उपस्थिती कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांची होती. अॅड. विवेक घाटगे म्हणाले, ज्यावेळी कोल्हापूरला काही द्यायची वेळ येते, तेव्हा खोडा घालण्याचे काम होते. खंडपीठ पुण्यात व्हावे, यासाठी पुण्यात आज, आंदोलन करण्यात आले आहे. त्याला मुंबईतीलच लोकांकडून खतपाणी घालण्यात आले आहे परंतु पुण्यात खंडपीठ होऊच शकत नसल्याचे यापूर्वी सांगण्यात आले आहे. आंदोलनाची धार वाढविण्याची वेळ आली आहे. प्रसंगी टोकाचा संघर्ष करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. महालोक अदालतीवर बहिष्कार घालू नये म्हणून कायद्याचे उल्लंघन होऊन वकिलीची सनद रद्द होईल, अशी भीती घालून अप्प्रचार केला जात आहे. परंतु त्याची पर्वा न करता आमची जेलमध्येही जायची तयारी आहे. त्याचबरोबर ही महालोक अदालत म्हणजे एक फार्सच आहे. कारण जे काम वर्षभर चालते ते काम एक दिवसाच्या या अदालतीमध्ये करण्याची गरज नाही.समितीचे माजी निमंत्रक अॅड. शिवाजीराव राणे म्हणाले, गेली २५ वर्षे खंडपीठासाठी लढा सुरू आहे. ते फक्त वकिलांचे आंदोलन न राहता जनआंदोलन झाले आहे. जनतेमुळेच वकिलांचे ५५ दिवसांचे आंदोलन होऊ शकले. हे आंदोलन सहा जिल्ह्णांतील जुन्या-नव्या वकिलांची मोट बांधून सुरू करण्यात आले. सिंधुदुर्गचे ज्येष्ठ वकील अॅड. राजेंद्र रावराणे म्हणाले, हुबळी, धारवाड येथे खंडपीठे झाली आहेत. तेथील प्रकरणांची संख्या निश्चित कोल्हापूरपेक्षा कमी आहे तरीही कोल्हापूरच्या मागणीला धुडकावून लावले जात आहे. महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, आम्हाला कुठलीही भीती घालू नये. आमचे आंदोलन सुरूच राहील. महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी सदस्य अॅड. श्रीकांत जाधव म्हणाले, मुंबईतील मनोज शिरसाट नावाचे वकील खंडपीठाच्या प्रश्नात कायम अडथळा आणत असून न्यायालयाचा अवमान होईल, अशी भीती वकिलांना घालत आहे. त्याचा निषेध करून त्याला त्याची प्रत पाठवूया. त्याचबरोबर इस्लामपूरचे वकील अशोक येडेकर यांनी खंडपीठप्रश्नी आमरण उपोषणाला बसण्याची तयारी दर्शविली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अॅड. वीरेश नाईक म्हणाले, आंदोलनाची नवी दिशा शोधली पाहिजे. मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्य न्यायाधीशांना गुलाबाचे फूल पाठवून त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून द्यावी. सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अजय डांगे, माजी अध्यक्ष दिलीप पाटील, पाटण बार असोसिएशनचे अध्यक्ष एम. एस. नांगरे, ज्येष्ठ वकील डी. डी. घाटगे, पी. आर. पाटील (कोल्हापूर), ज्येष्ठ वकील संभाजीराव मोहिते (कऱ्हाड), अॅड. एफ. ए. झारी (मिरज), अॅड. बाबासो पानस्कर (कऱ्हाड), अॅड. प्रमोद सुतार (सांगली) आदींची भाषणे झाली. यावेळी सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष महेश जाधव, विटा बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश पोवार यांच्यासह सहा जिल्ह्यातील वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)पक्षकारांसह देणगीदारांचा सत्कारखंडपीठ आंदोलनाला बळकटी देण्यासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांसह पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेणाऱ्या पक्षकारांचा यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सांगोला बार असोसिएशनचे पदाधिकारी यांचा दोन लाख रुपये देणगी दिल्याबद्दल, उद्योगपती विजय बुधले यांनी एक लाख रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचे पुत्र ओंकार बुधले यांचा तसेच पक्षकार संघटनेचे अध्यक्ष पद्माकर कापसे व प्रसाद जाधव यांचा समावेश होता.‘कोल्हापुरी हिसक्या’ला ‘सातारी तडका’खंडपीठाच्या मागणीसाठी आता गुळमुळीत अस्त्रे काढू नयेत. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. कोल्हापूर हे रांगड आहे. त्यामुळे येथील हिसका दाखविण्यासाठी अस काही तरी डोक्याला झिणझिण्या आणणारे कोल्हापुरी काढा की त्याला सातारी तडका देऊ, असे सातारा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगताच उपस्थितांमधून हशा पिकला. त्याला पाटण बार असोसिएशनचे अध्यक्ष एम. एस. नांगरे यांनी कोल्हापुरी हिसक्याला सातारी तडक्याबरोबरच पाटणचा दणका देऊन खंडपीठप्रश्नी लक्ष वेधूया, असा दुजोरा आपल्या भाषणात देताच आणखी हास्याचे फव्वारे उडाले.कोल्हापूर खंडपीठ कृती समितीतर्फे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात शुक्रवारी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्'ांतील वकिलांची परिषद झाली. यावेळी हात उंचावून अभिवादन करताना कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांच्यासमवेत अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. संभाजीराव मोहिते, अॅड. अजय डांगे, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. वीरेश नाईक, अॅड. के. व्ही. पाटील आदी.
खंडपीठासाठी वकिलांचे नव्याने रणशिंग
By admin | Published: December 05, 2014 11:01 PM