मुंबई : मुंबई आणि परिसरातील मिठागारांची जमीन तसेच स्वत:च्या मालकीची जमीन परवडणाऱ्या घरांच्या योजना उभारण्यासाठी देण्यास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज अनुकूलता दर्शविली. या योजनेचा वस्तुनिष्ठ आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी येथे दिले. पश्चिम क्षेत्रीय परिषदेची बैठक राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे राज्यातील मंत्री, दमण दिव दादरा नगर हवेलीचे प्रशासक, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते. मुंबई महानगरामध्ये परवडणारी घरे बांधण्यासाठी केंद्राच्या अखत्यारीतील अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली होती. त्यावर गृहमंत्र्यांनी सहमती दर्शविली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याला केंद्राचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. मुंबईत रेल्वे विभागाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा वापरही करता येईल, अशी सूचना फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र राज्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिली. फोर्स वन, एनएसजी हब, संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली, सीसीटीएनएस प्रणालीचा वापर, पोलीस दलाचे आधुनिकीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र सरकारच्या मुंबईतील जमिनींवर पुनर्विकासाची योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती स्वाधीन क्षत्रिय यांनी या वेळी दिली. (विशेष प्रतिनिधी) पोलीस दलासाठी केंद्र देणार निधी : महाराष्ट्रातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार भरीव मदत करेल, असे आश्वासन राजनाथसिंह यांनी दिले. मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याची कार्यवाही ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मिठागर जमिनीवर परवडणारी घरे
By admin | Published: October 22, 2016 1:33 AM