ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 2 - येथील कांदा लिलाव रोख रक्कम प्रश्नावरून शुक्रवार 20 एप्रिलपासून गेल्या 11 दिवसांपासून बेमुदत बंद होता. मात्र हा कांदा लिलाव बाजार समिती पदाधिकारी व व्यापारी यांची बैठक होऊन मंगळवारी पूर्ववत सुरू झाले. लासलगाव येथील लिलाव सुरू झाल्यानंतर आज मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सुमारे 750 वाहनातील कांद्याचा लिलाव किमान 300 ते कमाल 600 रुपये तर 470 रुपये प्रतिक्विंटल भावाने लिलाव झाले.दरम्यान बाजार समितीचे सभापती जयदत होळकर, संचालक पंढरीनाथ थोरे, संदीप दरेकर, रमेश पालवे, सचिन ब्रम्हेचा व सचिव बी. वाय. होळकर यांची व्यापारी प्रतिनिधी नितीन जैन, कांतीलाल सुराणा, ओमप्रकाश राका, ओम चोथाणी, बाळासाहेब दराडे, प्रवीण कदम, किसनराव दराडे यांच्यासह व्यापारी वर्गाशी चर्चा झाली. त्यानंतर प्रति शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये रोख व उर्वरित रक्कम राष्ट्रीयीकृत बॅकेच्या धनादेशाच्या सहाय्याने अदा करण्याचे ठरले. व्यापारी धनादेश रक्कम अदा न झाल्यास एनएफटीच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या शेतकरी वर्गाला रोख रक्कम देण्यास एकमत झाले आणि लिलाव पूर्ववत सुरू झाले.
लासलगावी 11 दिवसांनंतर कांदा लिलाव पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2017 5:39 PM