ऑनलाइन लोकमत
महाबळेश्वर, दि. 11 - श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे तब्बल 12 वर्षांनंतर आज रात्री 9.29 मिनिटांनी भगीरथी नदी प्रकटली. महाबळेश्वर येथील गंगाभागीरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे होते. तब्बल बारा वर्षांनंतर भागीरथी नदी गुरुवारी रात्री साडेनऊला प्रकट होणार होती. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा व दिव्यांनी सजवले होते. रात्री आठच्या सुमारास आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते सपत्नीक गंगापूजन करण्यात आले. दक्षिण भारतातील प्राचीन सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे यंदाच्या वर्षी शके १९३८ मध्ये श्रावण शु. ८ गुरुवार, दि. ११ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी बारा वर्षांतून गुरू कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. यावेळी भागीरथी नदी जलप्रवाह दृष्टिक्षेपास येणार आहे. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी क्षेत्र महाबळेश्वर येथे राज्यभरातील हजारो भाविक दाखल होत होते.भागीरथी नदी बारा वर्षांनंतर प्रकट होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. पंचगंगा देवस्थान व श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये सायंकाळी साडेसात वाजता आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते झेंडा पूजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून गंगापूजन करण्यात आले. साडेनऊला आरती करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविक भागीरथी नदीत स्नान करतील, अशी माहिती देवस्थानतर्फे देण्यात आली.क्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागीरथी आणि सरस्वती या नद्या उगम पावतात. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडातून नित्य निरंतर जलप्रवाह सुरू असतो. सरस्वती नदी ही सदैव गुप्त रूपाने वास करून असते. त्यामुळे तिच्यातील प्रवाह दिसत नाही.