- सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : केजमधील ४६ वर्षीय रुग्णाचा एचआरसीटी स्कोअर २५ होता, तसेच ऑक्सिजन लेव्हल अवघी १८ वर आली. तो रुग्ण ७६ दिवस व्हेंटिलेटर व बायपॅपवर होता. अशातही त्याने जिद्द सोडली नाही, तर डॉक्टर, परिचारिकांनीही अथक उपचार केले. त्यामुळेच १२२ दिवसांनी हा रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयाबद्दल पुन्हा एकदा विश्वास वाढला आहे.
केज तालुक्यातील सारूळ येथील श्रीहरी ढाकणे हे २८ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. एचआरसीटी स्कोअर १८ आला. ऑक्सिजन लेव्हलही सुरुवातीला केवळ ३३ होती. त्यानंतर स्कोअर कमी होण्याऐवजी वाढला आणि २५ वर पोहोचला. ऑक्सिजनही १८ वर आला. डॉक्टर, परिचारिकांनी मात्र हार मानली नाही. रुग्णाला ७६ दिवस व्हेंटिलेटर व बायपॅप ठेवले. अखेर त्यांना यातून बाहेर काढण्यात यश आले. शुक्रवारी १२२ दिवसांनी ढाकणे यांना जिल्हा रुग्णालयातून सुटी करण्यात आली. आतापर्यंत सर्वांत जास्त दिवस उपचार घेतलेला रुग्ण म्हणूनही त्यांची नोंद झाली आहे.
वजन १०७ वरून ६० वरढाकणे रुग्णालयात दाखल झाले तेव्हा १०७ किलो वजन होते. सुटी होतेवेळी त्यांचे वजन ४७ ने कमी होऊन ६० वर आले होते.
सरकारी रुग्णालयातही सर्वोत्तम उपचार सरकारी रुग्णालयात दर्जेदार उपचार मिळत नाहीत, दुर्लक्ष करतात, असे आरोप केले जातात; परंतु येथेही चांगले उपचार होतात, याचा हा पुरावा आहे. सुविधांबाबत कमी पडत असू; पण उपचारात कोठेच कमी नाही. अतिशय गंभीर असलेला रुग्ण १२२ दिवसांनंतर सुखरूप घरी परततोय, याचा खूप आनंद होतोय. -डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड