- राजेश निस्ताने, यवतमाळ
राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानांना जिल्हा बदलीसाठी असलेला १० वर्षे सेवेचा निकष बदलवून आता १५ वर्षे करण्यात आला आहे. त्यामुळे तमाम जवानांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे. महाराष्ट्रात राज्य राखीव पोलीस दलाचे १६ गट असून त्यात सुमारे २० हजार जवान कार्यरत आहेत. दहा वर्षे सेवा झालेल्या जवानांना जिल्हा बदली दिली जाते. राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या एकूण रिक्त जागांच्या १० टक्के जागा या जवानांसाठी राखीव ठेवल्या जातात. त्यानुसार वर्षाकाठी केवळ ३०० ते ४०० जवान जिल्हा पोलीस दलात दाखल होतात. कित्येकदा १२ ते १४ वर्षांची सेवा होऊनही रिक्त जागांअभावी अनेकांना जिल्ह्यासाठी सोडले जात नाही. दहा वर्षे सेवा हाच कालावधी खूप वाटत असताना आता १५ वर्षे सेवा झालेल्या जवानांनाच जिल्हा बदलीवर सोडले जाणार आहे. गृहविभागाचे उपसचिव सुरेश खाडे यांच्या स्वाक्षरीने २१ आॅक्टोबर रोजी या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले. या नव्या निकषामुळे जिल्हा बदलीस पात्र जवानांची संख्या कमी होणार असली तरी तब्बल १५ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याने बहुतांश जवानांमध्ये शासनाच्या या आदेशाबाबत तीव्र रोष दिसून येत आहे....आणि निकषच बदललेदरवर्षी कोट्यातील दहा टक्के जागानुसार जिल्हा बदली होत नाही, असा आरोप करीत एसआरपीएफ गट क्र.२ च्या (पुणे) काही जवानांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी उपमहानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी दरवर्षी दहा टक्के नियमित जिल्हा बदली केली जाईल, असे शपथपत्र दाखल केले होते. परंतु न्यायालयाच्या या निर्णयाला तीन वर्षे लोटण्यापूर्वीच शासनाने जिल्हा बदलीचा निकषच बदलविला.