मुंबई - येत्या एक-दोन दिवसांत मी माझा निर्णय घेणार आहे. मात्र, हा निर्णय घेताना तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेवून अंतिम निर्णय घेतला जाईल. तो घेत असताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, असे सूचक विधान शरद पवारांनी गुरुवारी कार्यकर्त्यांशी बोलताना केले आहे.
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यापासून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर ठाण मांडत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही कार्यकर्ते इथे आंदोलनाला बसले होते. पवारांनी दुपारी त्यांच्यासमोर येऊन राजीनाम्यामागील भावना आणि पुढील निर्णयाबाबत भूमिका जाहीर केली.
दोन दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही एवढी खात्री देतो, असे पवार यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. महाराष्ट्राबाहेरूनही अनेक सहकारी मुंबईत आले आहेत. मी त्यांच्याशी उद्या संध्याकाळपर्यंत चर्चा करणार आहे. ती चर्चा झाल्यानंतर जी तुमच्या सगळ्यांची भावना आहे ती नजरेसमोर ठेवून अंतिम निर्णय येत्या एक ते दोन दिवसात घेतला जाईल, अशा शब्दात पवार यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
...तर तुम्ही कधी हाेय म्हणाला नसता!पक्षातील सगळ्या सहकाऱ्यांची एकदंरीत जी तीव्र भावना आहे, ती तुमच्या रूपाने या ठिकाणी व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून तुम्ही आला आहात, तुम्ही तुमच्या भूमिकेसाठी अत्यंत आग्रही आहात. पक्षाच्या भवितव्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. नवीन नेतृत्व शक्तिशाली करावे हा त्याच्या मागचा हेतू होता. असे निर्णय घेताना सहकाऱ्यांशी विचार विनिमय करण्याची आवश्यकता असते. पण मला खात्री होती, मी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय म्हणाला नसता, असेही पवार यावेळी म्हणाले.
राजीनामा मागे घ्या, रक्ताने लिहिले पत्रराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख या आंदोलनात आघाडीवर असून त्यांनी पवार यांना उद्देशून रक्ताने पत्र लिहिले. ‘आदरणीय साहेब, विनंती आहे निर्णय मागे घ्या’, असा मजकूर मोठ्या अक्षरात लिहून शेख यांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती या पत्रात केली आहे.
देशभरातून दिग्गज विराेधी नेत्यांचे फोन शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आता देशभरातील नेतेमंडळींकडून त्यांना भावनिक साद घातली जात आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी फोनवरून त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे ज्येष्ठ नेते डी. राजा या नेत्यांनीदेखील फोन करून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे.