ऑनलाइन टीम
हैदराबाद, दि. १४ - सनरायझर्स हैदराबाद विरूध्द किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब संघाने हैदराबाद संघाचा पराभव करीत विजय मिळविला. हैदराबादने पंजाबसमोर २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पंजाबने ८ र्चेंडू आणि ६ गडी राखून पूर्ण केले.
हैदराबाद संघाने ठेवलेल्या २०६ धावांचा पाठलाग करताना पंजाबने आक्रमक सुरूवात केली. पण विरेंद्र सेहवाग अवघ्या ४ धावा काढून बाद झाला. परंतू व्होरा आणि वृध्दमान साहाने तुफानी खेळाचे दर्शन घडवले. या दोघांनीही हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. व्होराने २० चेंडूत ४७ धावा केल्या. यावेळी त्याने ५ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर साहाने २६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी करीत २२ चेंडूत ४३ धावा करीत संघाला विजयाजवळ आणून दिले. मिल्लर आणि बेलीने प्रत्येकी नाबाद २४ आणि ३५ करीत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, हैदराबाद संघाकडून फिन्चने २० धावा, शिखर धवन ४५ धावा (३७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार), वॉर्नर ४४ धावा आणि नमन ओझाच्या ३६ चेंडूत केलेल्या तडकाफडकी नाबाद ७९ धावांच्या जोरावर हैदराबाद संघाने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या.