लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तब्बल २१ वर्षांनी ठाण्यातील ३७ वर्षीय गीता एकनाथ अहिरे या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. स्वबळवार अभ्यास करून त्यांनी ६२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. निकाल कळताच त्यांचे पती, सासू, मुले, जाऊ, दीर, भाची, आजी सासू यांनी घरात एकच जल्लोष केला. कोणताही कोचिंग क्लास न लावता अथवा कोणाचेही मार्गदर्शन न घेता केवळ स्वबळावर घरसंसार सांभाळून त्यांनी बारावीचा अभ्यास केला. दिवसातून एक ते दोन तास त्या अभ्यास करीत. फक्त परीक्षेच्या १५ दिवसांच्या कालावधीत त्यांनी संपूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. वेळ मिळेल तसा अभ्यास करून त्यांनी ही परीक्षा जिद्दीने दिली आणि तितक्याच जिद्दीने यात यश मिळविले. मंगळवारी दुपारी दीड वाजता त्यांच्या पतीने फोनवरून त्यांना निकाल कळविला आणि घरात एकच जल्लोष झाला. त्यांच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांसहीत घरात नातेवाइकांनीदेखील अभिनंदनासाठी गर्दी केली. दहावीत मला मनासारखे टक्के मिळाले नव्हते आणि ती कसर भरून काढायची होती. बारावीच्या परीक्षेसाठी मी फार अभ्यास केला नव्हता. आणखी थोडा अभ्यास केला असता तर नक्कीच ८५ टक्क्यांच्या आसपास गुण मिळविले असते, अशा भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. सुनबाईचे यश पाहून खूप कौतुक वाटत आहे. दिवस-रात्र अभ्यास केला, अशा भावना त्यांच्या सासू अरुणा अहिरे यांनी व्यक्त केल्या. आनंदी झालेल्या त्यांच्या सासूने निकाल कळताच घट्ट मिठी मारली. पतीसह सर्वच नातेवाइकांनी पेढे भरविले. त्यांचा मुलगा हा बारावीमध्ये गेला असून, मुलगी सातवीला आहे. कला शाखेतून त्या बारावी पास झाल्या आहेत. पुढे याच क्षेत्रात पदवी घेऊन त्यांना लॉ करण्याची इच्छा आहे. गीता या ९६ साली दहावी पास झाल्या होत्या. परंतु, त्या वेळी त्यांना एका विषयात अपयश मिळाले. ९७ साली त्यांनी तो विषय सोडविल्यानंतर ९८ साली अकरावीचा अभ्यास सुरू केला. परंतु, त्याच वेळी लग्न ठरल्यामुळे त्यांना अकरावीचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. शिकण्याची पहिल्यापासून इच्छा असल्यामुळे या वेळेस बारावीची परीक्षा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या इच्छेला घरातील सासू, पती आणि मुलांनी पाठिंबा दिला.
तब्बल २१ वर्षांनी महिला बारावी पास
By admin | Published: May 31, 2017 3:58 AM