सिंधुदुर्गनगरी : राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये 22 वर्षांपासून अर्धवेळ काम करणाऱ्या 596 ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.राज्यात दोन हजार 409 पूर्णवेळ ग्रंथपाल व दोन हजार 322 अर्धवेळ ग्रंथपाल पदे आहेत. मात्र, सध्या राज्यात 596 पदे रिक्त होती. परंतु, राज्यात 988 ग्रंथपाल अर्धवेळ कार्यरत होते. गेल्या 22 वर्षांपासून अर्धवेळ ग्रंथपालांचा कायमस्वरुपी व पूर्णवेळ नियुक्तीसाठी लढा सुरु होता.
या संदर्भात भाजपचे आमदार अॅड. निरंजन डावखरे, नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले होते. त्याचबरोबर सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता.अखेर राज्यातील सेवाज्येष्ठतेनुसार 596 ग्रंथपालांचे रिक्त जागांवर समायोजन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. तसेच प्रत्येक शाळेत संचमान्यता झाल्यानंतर दीड महिन्यांत रिक्त ग्रंथपालपदांचा आढावा घेण्याचा निर्णय झाला.
उर्वरित जागांवर अर्धवेळ ग्रंथपालांचे समायोजन केले जाणार आहे. या निर्णयामुळे 596 ग्रंथपालांना दिलासा मिळाला आहे. या समायोजनासाठी ग्रंथालय संघाचे शेखर कुलकर्णी, अनुजा गोखले, विभा भगरे, प्रवीण धुमाळ, मंगेश यशवंतराव यांनी प्रयत्न केले होते.