मुंबई : तीन महिन्यांचा आराध्य गर्भात असतानाच त्याला हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. धुळ्यात जन्म झालेल्या आराध्यचे शरीर निळे पडत असल्याचे त्याच्या पालकांच्या लक्षात आले. बाळाच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले आणि हृदयातून रक्त बाहेर पडण्यासाठी असलेला मार्ग अत्यंत निमुळता होता. त्यामुळे आराध्यच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या रक्ताचा पुरवठा करणे हृदयासाठी कठीण होऊन बसले होते. वाडिया बालरुग्णालयातील डॉक्टरांनी २६ तास प्रयत्नांची शर्थ केली आणि आराध्यवर यशस्वी उपचार केले.प्रसूतीनंतर त्या बाळाच्या हृदयात समस्या असल्याचे नक्की झाले. कारण हृदयातून रक्त बाहेर जाण्याचा मार्ग अत्यंत निमुळता होता. परिणामी, शरीराला पुरेशा प्रमाणात आॅक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. दिवसेंदिवस बाळाचे शरीर निळे पडत होते. बाळाला केवळ ५०-६० टक्के आॅक्सिजन मिळत असल्याने त्याची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. छातीत झालेल्या संसर्गामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्याचा जीव वाचविण्यासाठी बीटी शण्ट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा आणीबाणीच्या प्रसंगी हाच मार्ग स्वीकारला जातो आणि त्यामुळे शरीराला आॅक्सिजनचा सुरळीत पुरवठा होतो व बाळाचा जीव वाचतो, असे वाडिया बालरुग्णालयातील मुख्य बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांनी सांगितले.आराध्यची शस्त्रक्रियेपूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यात कमालीची सुधारणा झाली आहे, मात्र या कठीण परिस्थितीत आराध्यने मृत्यूवर मात केल्याने आनंदाला पारावर उरलेला नाही, असे आराध्यचे वडील रवींद्र वाघ म्हणाले. वाडिया बालरुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनी बोधनवाला म्हणाल्या, रुग्णालयाने अलीकडेच नवजात आणि बालहृदयरोग शस्त्रक्रिया उपक्रम सुरू केला आणि आराध्यसारख्या लहान बाळांना याद्वारे मदत करता येते, याचा आनंद आहे. (प्रतिनिधी)
२६ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर आराध्यला जीवनदान
By admin | Published: April 10, 2017 4:15 AM