मुंबई/कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धात देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानाच्या विधवा पत्नीला शासकीय यंत्रणा तिला मिळणाऱ्या पेन्शनसाठी दारोदारी भटकायला लावणाऱ्या राज्य शासनाला उच्च न्यायालयाने सोमवारी कडक शब्दांत फटकारले व पुढच्या सोमवारी पेन्शन देण्याचा आदेशच घेऊन येण्यास बजावले. कोणतीही सबब ऐकली जाणार नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाच्या न्या. अनुप मोहता व न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने १७ तारखेपर्यंत सुनावणी तहकूब केली. शिरोळ (जि.कोल्हापूर) येथील तुळसाबाई गणपती सूर्यवंशी या ७६ वर्षीय वृद्ध महिलेला सन १९९० पासून म्हणजेच गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य सरकारे पेन्शनसाठी तांत्रिक कारणे काढून खेळवत असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. याला कंटाळून या वीरपत्नीने अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून याचिका दाखल केली.अॅड. सुतार यांनी युक्तिवादात सांगितले की,‘तुळसाबाई यांचे पती गणपती सूर्यवंशी हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करात दाखल झाले. त्यानंतर १९४७ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. तद्नंतर गणपती सूर्यवंशी व कुटुंबीय हे कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील रहिवासी होते. ते तेथेच कायमस्वरूपी स्थायिक झाले. गणपती सूर्यवंशी यांचे १९८५ मध्ये निधन झाले. तद्नंतर १९९० मध्ये श्रीमती तुळसाबाई त्यांच्या मुलासह महाराष्ट्रात शिरोळ गावी राहण्यास आल्या आणि कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी बनल्या. आजअखेर त्या महाराष्ट्रात कायमस्वरूपी रहिवास करून आहेत. (प्रतिनिधी)
वीरपत्नीला २७ वर्षांच्या लढाईनंतर पेन्शन
By admin | Published: April 11, 2017 1:23 AM