मुंबई : दरनिश्चिती समितीने केलेल्या शिफारशीनुसार मेट्रो-१ ने तिप्पट भाडेवाढीचे कोष्टक मेट्रोच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना प्रस्तावित भाडेवाढीला सामोरे जावे लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या भाडेवाढीनुसार घाटकोपर ते वर्सोवा प्रवासासाठी प्रवाशांना ११0 रुपये मोजावे लागणार आहेत.वर्सोवा-अंंधेरी-घाटकोपर या मेट्रोच्या तिकिटाचे दर वाढविण्यावरून रिलायन्स इन्फ्रा आणि एमएमआरडीएमध्ये वाद न्यायालयात पोहोचला होता. मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दरनिश्चिती समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या दरनिश्चिती समितीने आपला अहवाल मुंबई मेट्रो वन प्रा. लि. (एमएमओपीएल)कडे सादर केला आहे. समितीने किमान १0 ते कमाल ११0 रुपयांपर्यंत भाडेवाढ करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. भाडेवाढीस हिरवा कंदील मिळताच एमएमओपीएलने ३१ आॅक्टोबरपर्यंत कोणतीही भाडेवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असतानाच मेट्रोने प्रस्तावित भाडेवाढीचे कोष्टक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.सध्या मेट्रोचे किमान तिकीट १0 रुपये आणि कमाल तिकीट ४0 रुपये आहे. प्रस्तावित भाडेवाढीनुसार प्रवाशांना घाटकोपर ते वर्सोवा या प्रवासासाठी ११0 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दोन स्टेशनसाठी किमान १0 रुपये आणि त्यानंतरच्या प्रवासासाठी प्रत्येकी १0 रुपये मोजावे लागणार असून अखेरच्या स्टेशनपर्यंतच्या प्रवासासाठी ११0 रुपये प्रवाशांना द्यावे लागणार आहेत.तीन महिन्यांपर्यंत भाडेवाढ करणार नसल्याचे, सांगत मेट्रोने त्यापूर्वीच भाडेवाढीचे सुधारित कोष्टक संकेतस्थळावर टाकून भाडेवाढीचा सूचक इशारा मुंबईकरांना दिला आहे.
३ महिन्यांनंतर मेट्रोची भाडेवाढ?
By admin | Published: July 26, 2015 2:37 AM