३ राज्याच्या निकालानंतर मविआच्या जागावाटपात काँग्रेस आता बॅकफूटवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 06:37 AM2023-12-04T06:37:52+5:302023-12-04T06:38:59+5:30
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस हा आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष आहे
मुंबई - काँग्रेसने राजस्थान आणि छत्तीसगड ही सत्ता असलेली राज्ये गमावली, तर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला करिष्मा करता आला नाही. हिंदी पट्ट्यातील या तीनही राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असा दावा काँग्रेसचे नेते करत होते. मात्र, पराभवाने मविआच्या राज्यातील जागावाटपात काँग्रेसला बॅकफूटवर यावे लागणार आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस हा आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष आहे. असे असले तरी या निवडणुकीतील पराभवामुळे जागावाटपात आता शिवसेना आणि राष्ट्रवादी समसमान जागा वाटपावर आग्रही राहण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी १५ जागांवर ठाम
राष्ट्रवादीतील फुटीनंतर लोकसभेचे चारपैकी तीन खासदार शरद पवारांबरोबर आहेत. मात्र राष्ट्रवादीला (शरद पवार गट) राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी १५ जागा हव्या आहेत. या १५ जागांवर निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
जनतेची पंतप्रधान मोदींना साथ
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी काहीजण मोदींचा करिश्मा ओसरला असे म्हणत होते. त्यांच्यावर आरोप- प्रत्यारोप करत होते. मात्र जनतेने मोदींना साथ दिली हेच आजच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. घर घर मोदी, मन मन मोदी हेच या निकालामुळे सिद्ध झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा मोदीच निवडून येतील आणि इंडिया आघाडीचे पानिपत झालेले दिसेल. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मोदींशिवाय पर्याय नाही
चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालातून देशाला मोदींचे नेतृत्वच मान्य असल्यावर शिक्कामोर्तब झाले असून आता मोदींशिवाय पर्याय नाही. - अजित पवार, उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रात परिणाम होणार नाही
तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात भाजपचे विभाजनवादी राजकारण चालणार नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आजचे चित्र दिसणार नाही. त्यात बदल होईल आणि काँग्रेस पक्ष विजयी होऊन केंद्रात सत्तेत येईल. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस