शिवाजी गोरे
रत्नागिरी - दापोली तालुक्यातील दाभोळ धक्यावरून तब्बल ४५ वर्षांनंतर पहिली प्रवासी बोट आज मुंबईकडे रवाना झाली. ऐतिहासिक दाभोळ धक्का ते भाऊचा धक्का असा या बोटीचा प्रवास सुरू झाला आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी मेरिटाइम बोर्डाने ही बोट सुरू केली आहे , त्यामुळे या ऐतिहासिक बंदराला गतवैभव प्राप्त होणार आहे . दाभोळ बंदराला प्राचीन काळापासून फार महत्व आहे. आदिलशाही काळात दक्षिणेकडील राजे महाराजे दाभोळ बंदरातून हजला जात होते. हजला जाताना वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने दाभोळ येथे अंडा मजिद बांधण्यात आली होती. या बंदरात पोर्तुगीज, डच, छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाह, ब्रिटिश यांनी आरमार उभे केले होते.प्राचीन काळी दाभोळ बंदरात मोठी गलबते येत असत. मुंबई भाऊचा धक्का ते दाभोळ धक्का अशी प्रवासीबोट सेवा १९७२ पर्यंत सुरू होती. मात्र कालांतराने ही सेवा बंद पडली. आता ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे या धक्क्याला गतवैभव प्राप्त होतील, असे अपेक्षित आहे. या जलवाहतुकीने पर्यटनाला चालना मिळणार आहे.कोकणातील महामार्गावरील वाहतूक कोंडी पर्यटकांची डोकेदुखी बनली असून, महामार्ग अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर दरवर्षी शेकडो निष्पाप लोकांचे प्राण जात आहेत. हा ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक सुरू करण्याचा पर्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला होता. त्याला आता मूर्त स्वरुप येत आहे.रावे नावाची बोट ३५ प्रवासी घेऊन मध्यरात्री १ वाजता दाभोळ येथे आली. आज ही बोट ३५ प्रवासी घेऊन मुंबईकडे रवाना झाली.