मुंबई - महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि एकसंघ आहे. आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलोय. सकाळी अकरा वाजता बैठकीला बसलो, ७ वाजेपर्यंत ही बैठक चालली. आमची सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेकडून मी, विनायक राऊत, सीपीआयचे प्रतिनिधीही उपस्थित होते. ४८ जागांवर आमची चर्चा झाली. जागावाटप हे सुरळीत पार पडले आहे. कुणालाही चिंता करण्याचे कारण नाही. जे कोणी देव पाण्यात घालून बसलेत त्यांना सांगतो, सगळं काही ठीक आहे. आम्ही ३० तारखेला पुन्हा बैठकीला बसणार आहोत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. ८ तासाच्या या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर मविआ नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत बोलले की, वंचित बहुजन आघाडीसोबत आमचे कालपासून संवाद सुरू आहे. आज सकाळीही निमंत्रण पाठवले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि आमच्या नेत्यांशी चर्चा झाली. येत्या ३० तारखेच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होतील. वंचित बहुजन आघाडी हा मविआचा घटक पक्ष आहे आणि राहील. या देशातील लोकशाही टिकायला हवी. संविधानाची चीरफाड सुरू आहे ते वाचायला हवे. मोदींची एकाधिकारशाही सुरू आहे ती रोखायला हवी. ही भूमिका आमची आहे तशी प्रकाश आंबेडकरांचीही आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असं राऊतांनी स्पष्ट केले.
तसेच जागावाटपाबाबत ३० तारखेपर्यंत सर्वकाही निश्चित होईल. कुठल्याही फॉर्म्युल्यावर जाऊ नका. प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची असेल. वंचितसह आम्ही तिन्हीही पक्ष एकत्रित काम करणार आहोत. महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजू शेट्टी यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आहे. प्रत्येक घटक पक्षाच्या मागणीवर आमची चर्चा होईल असंही संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकारणावरही संजय राऊतांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले. नीतीश कुमार इंडिया आघाडी सोडणार असल्याची चर्चा आहे असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावर नीतीश कुमार हे इंडिया आघाडीचे स्तंभ आहेत. ते इंडिया आघाडी सोडणार नाहीत असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.