बारामती - Rajendra Pawar Statement ( Marathi News ) राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले. आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई होईल असं बोललं जात आहे. त्यातच आता आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर त्यावेळीच फूट पडली असती असा गौप्यस्फोट केला आहे.
राजेंद्र पवार म्हणाले की, काही वेळा लोकांच्या भावना असतात. त्या निनावी पत्राच्या रुपाने बाहेर येतात. बारामतीच्या लोकांच्या भावना अशाप्रकारे बाहेर आल्या असतील. छत्रपती कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा अप्पासाहेबांनी अजित पवारांना संधी दिली. त्यावेळी मी शेती बघत होतो. पण शरद पवारांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीत आले तेव्हा अजित पवार राजकारणात सक्रीय झाले. त्यावेळी मी दोनदा छत्रपती कारखानाच्या निवडणुकीत रस दाखवला. तेव्हा शरद पवारांनी मला दोन्ही वेळा आपण या क्षेत्रात जाऊ नये असं सांगितले असं त्यांनी म्हटलं.
तसेच हा शरद पवारांचा आदेश होता. त्यावेळी तो मी मानला. शरद पवारांना राजकारण जास्त कळतं. त्यामुळे कदाचित मी राजकीय क्षेत्रात आलो असतो तर आज जे काही दिसते त्याची सुरुवात त्याचवेळी झाली असती. पण जे झाले चांगले झालेले आहे. त्यामुळे मला शेतीकडे, सामाजिक कार्याकडे लक्ष देता आले. त्याचसोबत व्यवसायाचं बस्तान मला बसवता आले. त्याचा उपयोग रोहित पवारांना झाला असंही राजेंद्र पवार म्हणाले.
दरम्यान, पवार हे नाव दिल्लीपर्यंत शरद पवारांनी नेले. जे काही निर्णय शरद पवार स्वत: घ्यायचे. अजितदादांनी वेगळा विचार मांडला. भाजपासोबत गेले. त्यामुळे कदाचित लोकांना पवार कुटुंबात वाद झाला असं वाटत असेल. सुनेत्रा वहिनी कदाचित लोकसभेला उभं राहणार असतील त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम झाल्याचं दिसून येते. मला लोकांच्या राहायला आवडते, वडिलांपासून मला ती आवड होती. त्यामुळे मलाही सामाजिक कार्याची आवड होती. ती आजही करत राहिलो असंही राजेंद्र पवारांनी सांगितले.
वाद नको म्हणून रोहित पवार नगर जिल्ह्यात गेले
लोकांना वेगवेगळे विषय हवे असते. पवार कुटुंबात काय चाललंय त्यात डोकावण्याचा रस असतो. वस्तूस्थिती काय असते हे अनेकांना माहिती नसते. अद्याप कुणी समोर आले नाही. पवारविरुद्ध पवार निवडणूक होईल अशी शक्यता आहे. ही वेळ यायला नको होती. गेल्या ५० वर्षापासून अनेक कुटुंब शरद पवारांसोबत आहेत. अशावेळी त्या कुटुंबावर दडपण यायला नको. आजपर्यंत हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता. मागच्या ५ वर्षापूर्वी आमदारकीला उभे राहण्याची वेळ आली तेव्हा रोहित पवारांनी नगर जिल्ह्यात जाऊन मतदारसंघात निवडणूक लढवली. कुटुंबात वाद नको म्हणून ही भूमिका घेतली असंही राजेंद्र पवार यांनी सांगितले