अजित पवारांच्या घोषणेनंतर शिंदे गटाचा दावा, लोकसभेच्या १३ जागा लढणार, अमित शहांनीच शब्द दिलाय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:49 IST2023-12-01T17:48:38+5:302023-12-01T17:49:40+5:30
अजित पवार गटाने आजच्या मेळाव्यात चार जागा जाहीर केल्या आहेत. यामध्ये सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या जागा आहेत. म्हणजेच सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गट उमेदवार देणार आहे हे निश्चित झाले आहे.

अजित पवारांच्या घोषणेनंतर शिंदे गटाचा दावा, लोकसभेच्या १३ जागा लढणार, अमित शहांनीच शब्द दिलाय...
लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असे असताना महायुतीमध्ये जागावाटपावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: भाजपा २६ जागा लढविणार असल्याचे जाहीर केले होते. आता अजित पवार गट आणि शिंदे गट देखील आपापले दावे करू लागला आहे.
फडणवीस यांच्या दाव्यानुसार पवार आणि शिंदे गटाला उरलेल्या ११ जागा मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. आज अजित पवारांनी राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या चारही जागांवर आपले उमेदवार असणार असल्याचे जाहीर केले आणि पुन्हा एकदा शिंदे पवार गटांमध्ये दावे सुरु झाले आहेत.
एकनाथ शिंदे गट १३ जागा लढविणार आहे, अमित शाहंनी तसा शब्द दिला आहे, असा दावा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. स्वतः शिंदे यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा करून 13 जागा मिळणार असल्याचे स्पष्ट केले होते, त्यामुळे आम्ही 13 लोकसभेच्या जागा लढवणार आहोत, असे पाटील म्हणाले.
दरम्यान अजित पवार गटाने आजच्या मेळाव्यात चार जागा जाहीर केल्या आहेत. यामध्ये सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या जागा आहेत. म्हणजेच सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गट उमेदवार देणार आहे हे निश्चित झाले आहे. तसेच सातारा मतदारसंघात देखील शरद पवारांच्या खास मित्राविरोधात अजित पवार शड्डू ठोकणार आहेत. श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला होता. शिरूरमधून अमोल कोल्हे खासदार आहेत, परंतू ते दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र देऊन बसल्याने व सध्या शरद पवारांसोबत असल्याचे दिसत असल्याने ऐन उमेदवारीवेळी काय होते, याबाबतही राजकीय वर्तुळाच्या चर्चा रंगल्या आहेत.