- दीपक जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सैराट चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीच्या अभिनयाला पुणे बोर्डाकडून न्याय मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरल्याबद्दल कलागुणांसाठी देण्यात येणारे गुण तिला देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कलागुणांचा शाळेकडून प्रस्ताव पाठवूनही तांत्रिक कारणास्तव त्यांचे गुण न मिळालेल्या इतर विद्यार्थ्यांनाही त्याचे गुण देण्यात येणार आहेत. अभिनयातला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळवूनही केवळ तांत्रिक कारणास्तव अभिनायासाठी दिले जाणारे कलागुण रिंकू राजगुरूला देण्यात आले नसल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. यामुळे राज्य मंडळाकडून कलागुण देण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. एकीकडे स्थानिक पातळीवरच्या स्पर्धेमध्ये प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांना कलागुणांची खैरात करताना दुसरीकडे अभिनयातल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेतीला मात्र कलागुणांपासून वंचित राहावे लागले होते. राज्य शासनाने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला, अभिनय आदी क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणाऱ्यांना दहावीच्या परीक्षेत ५ ते २५ गुणांपर्यंत वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला. रिंकू राजगुरूने १७ नंबरचा फॉर्म भरून बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा दिली होती. तिला चित्रकलेतील प्रावीण्याबद्दल त्याचे ५ गुण बोर्डाकडून दिले गेले. मात्र अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळविल्याबद्दलचे १० गुण देण्यात आले नाहीत. ती बहिस्थ विद्यार्थी असल्याने तिला राष्ट्रीय पुरस्काराचे गुण देण्यात आले नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ती बहिस्थ विद्यार्थी असताना तिला चित्रकलेचे ५ गुण देण्यात आले मात्र राष्ट्रीय पारितोषिकासाठी मात्र वेगळा निकष वापरण्यात आला होता. बोर्डाकडून एकाच विद्यार्थ्याला कलागुण देण्यासाठी परस्परविरोधी कार्यपद्धती अवलंबण्यात आली होती. वस्तुत: राज्य शासनाच्या आदेशामध्ये बहिस्थ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्काराचे कलागुण देण्यात येऊ नयेत असा कुठेही उल्लेख नसताना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर याबाबतचा निर्णय घेतला होता. तांत्रिक मुद्द्यांमुळे वंचितांनाही न्याय...विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे धोरण शासनाकडून आखले गेले. त्यानुसार योग्य ती प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून गुण दिले जाणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात मंडळाकडून तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या गुणांपासून वंचित ठेवल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. - रिंकू राजगुरू प्रमाणेच तांत्रिकेतच्या मुद्द्यांवर कलागुण देण्याचा निर्णय राखून ठेवलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही कलागुण देण्यात येणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू हिस राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कलागुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल.- बबन दहिफळे, अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे विभाग