अकोला - किडनी तस्करी प्रकरणामध्ये मानवी अवयव तस्करीचा गुन्हा अखेर शुक्रवारी दाखल करण्यात आला. त्यामुळे प्रकरणातील वैद्यकीय, तांत्रिक बाजु तपासण्यास, पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मदत होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी देवेंद्र शिरसाटच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायालयाने मंगळवार, १५ डिसेंबरपर्यंंत वाढ केली असून, त्याचा साथीदार आनंद जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. डाबकी रोड पोलीस ठाण्यामध्ये संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आनंद जाधव, देवेंद्र शिरसाट व किडनी तस्करी प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४१७ व ४२0 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हय़ाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असून, त्यांच्या ताब्यात असलेल्या तीन्ही आरोपींच्या चौकशीमधून समोर आलेले पुरावे व काही दस्तऐवजांवरून या तिघांवरही शुक्रवारी कलम ३७0 नुसार अवयव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी कोळी, आनंद जाधव व देवेंद्र शिरसाट या तिघांवर अवयव तस्करीचा गुन्हा दाखल केल्यानंतर अवयव प्रत्यारोपण करणारे डॉक्टरही लवकरच समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी शिवाजी कोळीसह तीन्ही आरोपींना नागपूर व यवतमाळमध्ये नेऊन तपासणी केल्यानंतर या तिघांविरुद्ध अवयव तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. कोळीचे नागपूर व यवतमाळ कनेक्शन किडनी तस्करीवर शिक्कामोर्तब करणारे असून, या दोन्ही शहरातील डॉक्टरांवरही अवयव तस्करीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
अखेर मानवी अवयव तस्करीचा गुन्हा दाखल!
By admin | Published: December 12, 2015 2:45 AM