सुधीर लंके । लोकमत न्यूज नेटवर्ककोपर्डी (जि. अहमदनगर) : अमानुष अत्याचारानंतर शाळकरी मुलीची हत्या झाल्याच्या घटनेने वर्षभरापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी गावाला भेट दिली, पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. ‘कोपर्डी’ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दिलेली आश्वासने मात्र अजून पूर्ण झालेली नाहीत. गावाला वर्षभरात ना माध्यमिक विद्यालय मिळाले, ना आरोग्य उपकेंद्र. पोलीस चौकी कागदोपत्री मंजूर झाली; पण प्रत्यक्षात उभी राहिलेली नाही.गुरुवारी १३ जुलैला कोपर्डीतील अमानुष अत्याचाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. नववीतील शाळकरी मुलीवर गावातील नराधमांनी अत्याचार केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, राज ठाकरे आदी नेत्यांनी भेट देऊन मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर राज्यभर निषेधाचे मोर्चे निघाले. विधिमंडळात पडसाद उमटले. कोपर्डीला मिळालेल्या आश्वासनांचे काय झाले? याचा मागोवा घेण्यासाठी ‘लोकमत’ने कोपर्डीला भेट दिली. मुलीचे कुटुंब आजही त्या घटनेने सुन्न आहे. आर्थिक मदतीचे आम्हाला दिलेले आश्वासन सरकारने पाळले, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. मात्र गावाला आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत. गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यानंतर मुलांना चार किलोमीटरवर कुळधरण किंवा शिंदे गावात जावे लागते. गावातील दोनशेहून अधिक मुले-मुली परगावी शाळेत जातात. त्यासाठी केवळ एक एस.टी. बस येते. अनेकांना सायकलवरुन किंवा पायपीट करत शाळेत जावे लागते. भैय्यूजी महाराजांनी मुलींसाठी दोन मिनी व्हॅन दिल्या. मात्र, त्याही अपुऱ्या पडतात. शासनाने गावातच अनुदानित माध्यमिक विद्यालय सुरु करावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, त्याचा विचार झालेला नाही. कोणत्याही संस्थेने शाळेचा प्रस्ताव दिलेला नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. गावात आरोग्य उपकेंद्राला शासनाने मंजुरी दिली. इतर आरोग्य केंद्रातील पदे येथे समायोजित करुन ते चालवा, असा आदेश आहे. त्याच्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. ग्रामपंचायतने देऊ केलेल्या एका खोलीत तात्पुरते उपकेंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. घटनेनंतर वर्षभर मुलीच्या घरासमोर पोलिसांच्या राहुट्या व बंदोबस्त आहे. आरोपीच्या घरालाही बंदोबस्त आहे. कुळधरण येथे कायमस्वरुपी पोलीस चौकी उभारण्याचे शासनाने आश्वासन दिले. चौकी मंजूर झाली. मात्र, त्यासाठी जागाच नाही. पोलीस तात्पुरत्या राहुट्यांत कधी कुळधरण तर कधी कोपर्डीला असतात. गावासाठीचा कोपर्डी- राक्षसवाडी हा पाच किलोमीटरचा सव्वा कोटीचा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र, त्याचेही काम प्रत्यक्षात सुरु झालेले नाही. रस्त्याच्या भूमिपूजनाचा फलक जानेवारीतच लागला आहे. कोपर्डीचा खटला नगरच्या सत्र न्यायालयात सुरु आहे. त्याचा निकाल लागल्यानंतरच न्याय मिळतो की नाही हे ठरेल, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. मुलीच्या हत्येनंतर शाळेने तिच्या विम्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविला. मात्र, तो सुद्धा अद्याप मंजूर झालेला नाही. >मुलीचे स्मारकभैय्यूजी महाराज यांनी अत्याचारित मुलीचे तिच्या घरासमोर ‘युगंधरा’ हे स्मारक उभारले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मुलीचा ‘ब्रॉण्झ’ चा पुतळा बसविण्याचे नियोजन आहे, सूर्योदय परिवाराचे सदस्य भाऊराव पाटील व समीर पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. १३ जुलैला प्रथम स्मृतिदिनी भैय्यूजी महाराज व मुलीच्या आईच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण होईल.शासनाची इच्छाशक्ती हवी...इच्छाशक्ती असेल तर शासन कोपर्डीची शाळा विशेष बाब म्हणून मंजूर करु शकते. शाळा, पोलीस चौकी व उपकेंद्राला जागाही उपलब्ध होऊ शकते. कोठेच जागा मिळत नसेल तर मी स्वत:ची जागा देण्यासाठी तयार आहे, असे लालाशेठ सुद्रिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बहीण जिद्दीने बारावी उत्तीर्ण अत्याचारित मुलीची मोठी बहीण जिद्दीने उभी राहिली. यावर्षी ती बारावी उत्तीर्ण झाली. विखे फाऊंडेशनने तिला दत्तक घेतले असून औषधनिर्माणशास्त्र शाखेला तिला प्रवेश मिळाला आहे. माझ्या ताईला नराधमांनी हिरावून घेतले, पण मी शिकून तिचे स्वप्न साकारणार, असे तिने सांगितले.>‘कोपर्डी’चा घटनाक्रम१३ जुलै २०१६ - सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून१५ जुलै - मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे यास श्रीगोंदा येथून अटक १६ जुलै - दुसरा आरोपी संतोष भवाळ यास अटक१७ जुलै - तिसरा आरोपी नितीन भैलुमे यासही अटक १८ जुलै - घटनेतील दोघा आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला२० जुलै - कर्जत येथील मुलींकडून घटनेचा निषेध २४ जुलै - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपर्डीला भेट २३ सप्टेंबर - कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर शहरात ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चा ७ आॅक्टोबर - तिघा आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल १ एप्रिल २०१७ - कोपर्डी खटल्यातील तिघा आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला २२ जून - खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने एकूण ३१ साक्षीदार तपासले़ २३ जून - खटल्यात बचाव पक्षाकडून मुख्यमंत्री व सरकारी पक्षाच्यावतीने खटला चालवित असलेले अॅड़ उज्ज्वल निकम यांची साक्ष घेण्याची मागणी २ जुलै - कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने मुलीचे स्मारक बांधण्याचा निर्णय ७ जुलै - अॅड़ उज्ज्वल निकम यांची साक्ष घेण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
वर्षभरानंतरही ‘कोपर्डी’ उपेक्षितच!
By admin | Published: July 13, 2017 6:00 AM