कल्याण : पर्यावरण विभागाचा दाखला मिळाल्यानंतर रखडलेले १७ कोटींचे अनुदानही केंद्र शासनाकडून केडीएमसीला मिळाले आहे. त्यामुळे बीएसयूपी प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शहरातील गरिबांना घरकुले बांधून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने बीएसयूपी प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प १०८ कोटी २७ लाखांचा आहे. त्याला केंद्र सरकारचे ४७ कोटी ५३ लाख तर राज्य सरकारचे ३५ कोटी ५४ लाखांचे अनुदान मिळाले आहे. याआधी केंद्राने ३० कोटी ५८ लाखांचे अनुदान दिले होते. परंतु, कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने केंद्र सरकारने उर्वरित १७ कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव दोनदा नाकारला होता. त्यातच घोटाळ्यांच्या आरोपांमुळे हा प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकला. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती.दरम्यान, आयुक्त ई. रवींद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांनी दिल्लीत जाऊन केंद्राच्या नगरविकास विभागाचे सचिव अध्यक्ष असलेल्या सेंट्रल मॉनिटरिंग कमिटीसमोर बीएसयूपीच्या कामांचे सादरीकरण केले. यात त्यांनी कामाला आलेल्या गतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच केडीएमसीला १७ कोटींचे अनुदान दिले. त्यामुळे निधीअभावी रखडलेले बीएसयूपी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>६,२९५ सदनिकांची कामे अंतिम टप्प्यातआतापर्यंतच्या कामांचा आढावा घेता ८ हजार १८८ सदनिकांपैकी ४८१ सदनिकांचे वाटप झाले आहे. कचोरे येथील १,०८२ आणि कल्याणच्या इंदिरानगरमधील ३३० अशा एकूण १,४१२ सदनिका तयार आहेत, तर उर्वरित ६ हजार २९५ सदनिकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
बीएसयूपी प्रकल्पातील अडथळे अखेर दूर
By admin | Published: June 13, 2016 4:04 AM