ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - राज्यातील १४ हजार ७०८ गावांमध्ये शुक्रवारी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती पाहता लवकरात लवकर सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. यावर आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या झालेल्या बैठकीत दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत राज्यातील ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असणा-या १४ हजार ७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, या दुष्काळी भागात कापूस, सोयाबिन,मका, ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शेतक-यांच्या कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे. याचबरोबर या भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.