मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सपशेल अपयश आले. त्यामुळे दलित मतदारांचाही भ्रमनिरास झाला आहे. हे पाहून सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दलित मतदारांना आकर्षित कऱण्यासाठी प्रयत्न लावले आहेत. त्याला प्रकाश आंबेडकरांनी लागलीच प्रत्युत्तर दिले. आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरल्याचे दिसत आहे.
शरद पवार आज इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी करणार आहेत. दलित प्रामुख्याने काँग्रेसकडे तर चर्माकार शिवसेनेकडे असं पूर्वीचं समीकरण होतं. मात्र गेल्या वर्षी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर दलित मतं एकगठ्ठा वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गेली आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
लोकसभेला मोठ्या प्रमाणात मतं मिळूनही वंचित बहुजन आघाडी विधानसभेला फारशी कमाल दाखवू शकली नाही. लोकसभेत मतं मिळाली असी तरी त्याचा फायदा विधानसभेला अपेक्षीत होता. मात्र विधानसभेला वंचितच्या पदरात काहीच आले नाही. त्यामुळे दलित मतदार संभ्रमात आहेत. याचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रयत्न केले सुरू केले आहे. एक जानेवारी रोजी अजित पवार भीमा कोरेगाव येथे दाखल झाले होते. तर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. तसेच पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय मंजूर करून घेतला होता.
दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी स्मारकासाठीचा निधी वाडिया रुग्णालयासाठी अत्यावश्यक असून तो निधी तिकडे देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीला शह देण्यासाठी आंबेडकरांची ही खेळी होती. आता खुद्द शरद पवारच इंदू मिल येथील स्मारकाच्या जागेची पाहणी करून स्मारकाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. वंचितमुळे नाराज झालेल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा इरादा असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.