मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार का याबाबत विविध चर्चा सध्या सुरू आहे. मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसेचा महायुतीत सहभाग निश्चित मानला जात आहे. मात्र मनसेला किती जागा सोडणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. परंतु दिल्लीवारी नंतर आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार असल्याचं पुढे आले आहे.
मनसेला दोन जागा सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यात दक्षिण मुंबईची जागा मनसे लढवणार असं बोललं जाते. या जागा शिवसेनेकडे आहेत. दक्षिण मुंबई आणि शिर्डी, नाशिक या जागांबाबत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होईल. प्रामुख्याने कुठल्या जागांवर लढायचं यावर या भेटीत चर्चा होणार आहे.
मनसेची मुंबईतील ५ लाख मते कुणाच्या पारड्यात?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ २५ मतदारसंघांत निवडणूक लढवत मिळवलेली पाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. तेवढी मते येत्या लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळणार का? व मिळाली तर कुणाच्या विजयात मोजली जाणार हा चर्चेचा विषय आहे. मनसेने त्यावेळी २५ विधानसभा लढवून मिळविलेल्या ४.६२ लाख मतांपैकी सर्वाधिक १.२३ लाख मते उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मुलुंड, विक्रोळी, भांडूप पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि घाटकोपर पूर्व इथली होती. येथील मानखुर्द शिवाजीनगरमधून मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे भाजपच्या साथीला मनसे आल्यास येथून इंडिया आघाडीविरोधात उभे ठाकलेले भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यासाठी लोकसभेचा पेपर सोपा ठरण्याची शक्यता आहे.
त्याखालोखाल अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन- कोळीवाडा, वडाळा, माहीम या शिवसेनेचा (उबाठा) गड असलेल्या दक्षिण मध्य मुंबईतून मनसेला ९६,४९८ मते मिळाली होती. माहीममध्ये तर तब्बल ४२ हजार ६९० मते मनसेच्या संदीप देशपांडे यांनी घेतली होती. माहीम खालोखाल मागाठाणे येथून मनसेच्या नयन कदम यांनी ४१,०६० मते घेतली होती. मागाठाण्याचा समावेश असेलल्या उत्तर मुंबईतून भाजपने पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात मनसेने सहापैकी केवळ तीन विधानसभा जागा लढवून ६८,२४४ मते मिळवली, हे विशेष आहे.