मुंबई - एकेकाळी राज्य काँग्रेसच्या पहिल्या फळीत स्थान मिळवलेले हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये सामील झाले. मात्र त्याआधीच त्यांनी कन्या अंकिता पाटील यांना राजकारणात लॉन्च केले होते. आता अंकिता यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील देखील सक्रिय राजकारणात सक्रिय झाले आहे.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन यांनी नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. राजवर्धन यांची संचालकपदी बिनविरोध निवड होणार आहे. याची केवळ घोषणा बाकी आहे. माजीमंत्री हर्षवर्धन पाटील हे निरा भीमा सहकारी कारखान्याचे संस्थापक असून स्थापनेपासून कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच अंकिता पाटील यांनी काँग्रेसकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या आहेत.
दरम्यान इंदापूरमधून तिकीट मिळत नसल्याचे दिसताच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून इंदापूरमधून निवडणूक लढवली. मात्र सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता. हर्षवर्धन पाटील आता आमदारही नाहीत. मात्र मुलीपाठोपाठ त्यांनी मुलालाही सक्रिय राजकारणात सामील करून घेतले आहे.