पेण : नगर परिषद निवडणूक अर्ज छाननीत बुधवारी नाट्यमय घडामोडींचा सिलसिला दिसून आला. शेकापचे माजी नगराध्यक्ष राहिलेले गुरुनाथ मांजरेकर यांनी शिवसेनेच्या तंबूत प्रवेश करून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप वर्तक यांचाही अर्ज भरला गेला. या दोन अर्जांमध्ये प्रदीप वर्तक यांचा अर्ज प्रथमदर्शनी एबी फॉर्म सहीने भरल्याने त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरल्याने गुरुनाथ मांजरेकर यांचा पत्ता आपोआप कट झाला आहे. शिवसेनेकडूनच अपुऱ्या माहितीच्या अनुषंगाने लढाई लढण्यापूर्वीच गुरुचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने शिवसेना बॅकफूटवर आली आहे. आता सामना होणार तो काँग्रेस विरुध्द भाजपा शेकाप प्रणीत विकास आघाडीमध्येच, त्यामुळे पेण नगर परिषद निवडणूक दुरंगी होणार आहे. पेण नगर परिषद निवडणूक अर्जात एकूण ११२ उमेदवारांपैकी ४३ अर्ज बाद ठरविण्यात आले. प्रमुख सत्ताधारी काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदासाठी विद्यमान नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्यासह १० वॉर्डातील २१ उमेदवारांमध्ये ६ विद्यमान नगरसेवकांना तिकीट वाटप झाले असून १५ उमेदवार नवखे आहेत. दुसरीकडे भाजपा शेकापप्रणीत नगर विकास आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी संतोष शृंंगारपुरे तर २१ जागांमध्ये विद्यमान ७ नगरसेवक, ३ माजी नगरसेवकांसहित ११ नवोदित उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेनेतर्फे ११ उमेदवार, मनसेतर्फे २ उमेदवार व अपक्ष १४ असे उमेदवार रिंगणात आहेत.उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत सत्ताधारी व विरोधी गटातर्फे तज्ज्ञ वकील मंडळींचा संच दिमतीला होता. शेकापच्या प्रभाग १० मधील महिला उमेदवार मोहिनी दिवेकर यांच्या अर्जावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत उमेदवार अवैध ठरविण्याचा सामना चांगला रंगला. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांना योग्य ते पुरावे दाखल केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरवित निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप घेणाऱ्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. (वार्ताहर)
पेणमध्ये १२२ पैकी ४३ उमेदवारी अर्ज बाद
By admin | Published: November 03, 2016 2:47 AM