पुणे : एफटीआयआयमध्ये पुन्हा विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये धुमसान सुरु झाले आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा असंतोष पसरु लागला आहे. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पूर्व निर्मिती बैठकीवर बहिष्कार टाकल्याने पाच विद्यार्थ्यांना तीन दिवसांच्या आत वसतिगृह रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तिसरे सत्र होईपर्यंत तुम्ही संस्थेच्या आवारात थांबण्याची गरज नसल्याचे विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तिस-या सेमिस्टरला असणा-या ‘संवाद फिल्म’ या प्रोजेक्टसाठी पुरेसा वेळ देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांनी निर्मितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत विद्यार्थ्यांनी फिल्म मेकींगचे अधिष्ठाता तसेच इन्स्टिट्यूटच्या संचालकांशी पत्रव्यवहार केला होता. त्याबाबत विद्यार्थ्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टसाठी वेळ वाढवून देण्याच्या केलेल्या मागणीची दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांनी निर्मिती बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
याविषयी एफटीआयआयचा विद्यार्थी प्रतिनिधी रॉबिन जॉय म्हणाला, ‘फिल्म अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा संवादावर आधारित लघुपट तयार करण्याचा प्रोजेक्ट तयार करायचा असतो. त्यासाठी पूर्वी प्रत्येक गटासाठी ३ दिवस व दिवसातील आठ तास देण्यात येत होते. यंदा मात्र प्रत्येक गटासाठी फक्त दोनच दिवस आणि १२ तास देण्यात आले आहेत. एका गटातील विद्यार्थी हे दुस-या गटातही असतात. प्रत्येकाला स्वत:चा स्वतंत्र लघुपटही तयार करायचा असतो. त्यामुळे दिवसातले १२ तास एकाच गटासाठी घालवल्यास बाकीचे विद्यार्थ्यांना त्यांच्या लघुपट वेळेत तयार करणे शक्य नाही. या लघुपटांसाठी बाहेरील कलाकार असल्याने त्यांचा वेळ मिळविणे अवघड आहे. अनेक लघुपट हे लहान मुलांवर चित्रित होणार असल्याने त्यांना १२ तास थांबवूण ठेवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही दिवस वाढवून देण्याची मागणी केली होती, मात्र संस्थेने आम्हाला कुठलेच उत्तर दिले नाही. पहिल्या व दुस-या गटाचे जे विद्यार्थी पूर्व निर्मिती बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, त्यांना वसतीगृह रिकामे करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
याविषयी एफटीआयआयचे संचालक भुपेंद्र कँथोला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. संस्थेच्या चित्रपट विभागाचे अधिष्ठाता अमित त्यागी यांनी पुण्याबाहेर असल्याने प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली.