ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडलेला असतानाच आयपीएल सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाणार असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश दिले आहेत.
आयपीएलच्या सामन्यांसाठी लागणारे पाणी दुष्काळग्रस्तांना देण्याचे आश्वासन बीसीसीआयने मुंबई उच्च न्यायालयाला दिले असूनही न्यायालयाने एप्रिल महिन्यानंतर महाराष्ट्रात सामने खेळू देण्यास नकार दर्शवला आहे.
९ एप्रिल रोजी सुरू झालेल्या आयपीएलच्या ९ व्या सत्रात महाराष्ट्रात एकूण १९ सामने खेळवले जाणार होते. एप्रिलमध्ये ७ तर मे महिन्यात १२ सामने खेळवण्यात येणार असून त्यात २ सेमीफायनल व फायनलचाही समावेश आहे. मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर हे उर्वरित सामने कुठे खेळवले जातील याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान मुंबई आणि पुणे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 कोटींची मदत करणार असल्याचे बीसीसीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र हे सामने 30 एप्रिलपर्यंतच खेळवा असा आदेशच कोर्टानं बीसीसीआयला दिला आहे.
आयपीएलसाठी वापरलं जाणारं पाणी दुष्काळग्रस्तांना देण्यास तयार आहात का, असा प्रश्न कोर्टानं बीसीसीआयला केला होता. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान बीसीसीआयनं पाणी देण्यास सहमती दर्शवली असूनही, 30 एप्रिलनंतर राज्यात आयपीएल नको, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळतोय बीसीसीआय मुख्यमंत्री रिलीफ फंडला मदत करण्याचा विचार करतेय का, असाही सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारला होता. त्यावर दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यास तयार असल्याचं बीसीसीआयनं न्यायालयाला सांगितलं होतं.