मुंबई : राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकलच्या प्रवेशावर दिलेल्या स्थगितीबाबत आपली बाजू सक्षमपणे मांडेल आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मराठा समाजाच्या मेडिकलला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी एसईबीसी कोट्यातून मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर १ हजार ४३५ मराठा विद्यार्थ्यांनी मेडिकलला प्रवेश घेतला होता. परंतु न्यायालयाने असा प्रवेश देता येणार नाही, असे सांगितल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मेडिकलच्या विद्यार्थांचा प्रश्न सोडवावा, यासाठी राज्यभरातून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सोमवारी मुंबईत आले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर निदर्शने केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.राज्यात ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा आरक्षण लागू करण्यात आले. परंतु आरक्षण लागू होण्याआधी १३ नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आल्याने त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला. यावर राज्य सरकारने मेडिकल प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ठरल्याप्रमाणे सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे.
आश्वासनानंतर मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन शुक्रवारपर्यंत स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 7:36 AM