बिहार, कर्नाटकनंतर भाजपच्या रडारवर महाविकास आघाडी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 03:12 PM2019-12-10T15:12:37+5:302019-12-10T15:12:51+5:30
कर्नाटकपूर्वी भाजपने बिहारमध्ये देखील लालू प्रसाद यादव यांच्या राजदला धक्का देत सत्तेतून बाहेर केले होते. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रावर भाजपची नजर आहे.
मुंबई - कर्नाटकमध्ये नुकत्याच 15 जागांवर झालेल्या पोट निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या कारभारापेक्षा ते कोसळण्याच्या चर्चांच अधिक असल्याचे दिसून येत आहे. तसा प्लॅनच भाजपने सुरू केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा गोड बातमीचा उल्लेख केल्यामुळं या शक्यतांना पाठबळ मिळत आहे.
कर्नाटकमधील बंडखोर आमदारांवर केलेल्या कारवाईनंतर १५ विधानसभा जागांवर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांत भाजपने १२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या सरकारला बहुमतासाठी सहा जागांची आवश्यकता असताना त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्याने आता हे सरकार स्थिर झाले आहे. काँग्रेसने फक्त दोन जागा जिंकल्या असून जनता दल (एस)ला एकाही जागेवर विजयी पताका फडकाविता आलेली नाही.
कर्नाटकपूर्वी भाजपने बिहारमध्ये देखील लालू प्रसाद यादव यांच्या राजदला धक्का देत सत्तेतून बाहेर केले होते. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रावर भाजपची नजर आहे.
राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊऩ सरकार स्थापन केल्याने भाजपच्या इराद्यावर पाणी फेरले गेले. आता पुन्हा एकदा भाजप उचल घेणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र आमदार फोडून की, राष्ट्रवादीला सोबत घेऊन ते येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.