"...त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांचं ऐकून घेतील"; 'कुरकुरणाऱ्या' काँग्रेसला 'वेटिंग'चे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:56 AM2020-06-16T11:56:06+5:302020-06-16T12:29:25+5:30

महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचं वृत्त होते. विधानपरिषदेच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलं होतं.

... After that, Chief Minister Uddhav Thackeray will listen to everyone, sanjay Raut's explanation | "...त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांचं ऐकून घेतील"; 'कुरकुरणाऱ्या' काँग्रेसला 'वेटिंग'चे संकेत!

"...त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांचं ऐकून घेतील"; 'कुरकुरणाऱ्या' काँग्रेसला 'वेटिंग'चे संकेत!

Next

मुंबई - राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना महाविकास आघाडी सरकारमध्येही नाराजी असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी नोकरशहांवर मंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप केला आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा मुद्दा समोर आणणार आहे असं त्यांनी सांगितले होते. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत असून लवकरच मुख्यमंत्री काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन चर्चा करतील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचं वृत्त होते. विधानपरिषदेच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलं होतं. तर, एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना अशोक चव्हाण म्हणाले की, अधिकाऱ्यांमुळे सरकारमध्ये मतभेद होत आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पुढील २-३ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही सरकारमध्ये काही मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे असं सांगत महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करुन घ्यावं अशी आग्रही मागणी केली होती. तसेच भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने सरकारला साथ दिली आहे, याचा अर्थ काँग्रेस कमकुवत आहे असं नाही. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस मंत्र्यांचे ऐकलं जात नाही. तिन्ही पक्षाचं मिळून हे सरकार बनलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चित काँग्रेसचं जे म्हणणं आणि मुद्दे असतील ते ऐकून त्यावर तोडगा काढतील अशी अपेक्षा मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यानंतर, आता खासदार संजय राऊत यांनी सर्वकाही ठिक असल्याचं म्हटलंय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारच्या सर्वच मंत्र्यांसोबत चांगला समन्वय आहे. सरकारमध्ये कुणीही नाराज नाही, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सदैव तत्पर आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी बोलणं झालं असून कोरोनाचं संकट गेल्यानंतर मुख्यमंत्री सर्वाचं ऐकून घेतील, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आज काँग्रेसला चिमटा काढला होता. 

'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा इशारावजा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला होता. मात्र, आता सर्वकाही ठिक असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. 

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार राज्यसभा निवडणुकीवेळीही राज्यात राष्ट्रवादीने काँग्रेसशी चर्चा न करता दुसरा उमेदवार उतरवला होता. ज्यावेळी राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षाचे २ उमेदवार जिंकणे सहज शक्य होतं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचा एक उमेदवार मागे घेण्यास भाग पाडलं. सत्तेत समान वाटा मिळेल असं सरकार स्थापन करण्यापूर्वी ठरलं होतं असंही ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. आता राज्यपाल कोट्यातील १२ जागांमध्ये प्रत्येक पक्षाला समसमान जागा मिळायला हव्यात, पण आता राष्ट्रवादी-शिवसेना विधानसभेतील जागांनुसार वाटप करण्याचं योजत आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे सरकारमध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण होते असं ते म्हणाले.
 

Web Title: ... After that, Chief Minister Uddhav Thackeray will listen to everyone, sanjay Raut's explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.