ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सेना-भाजपाच्या युतूवर चर्चा सुरु झाली. दोन्ही पक्षातील नेत्यांनी युतीबाबतचे संकेत दिले, मात्र जागावाटप आणि मुंबईचा महापौर कोणाचा? यामुळे युतीवर अद्याप शिकामोर्तब झाले नाही. सुत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार, संक्रातीचा सण झाल्यानंतर 15 जानेवारी युतीचा निर्णय होणार आहे. संक्रांत असल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा होणार नसल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, आज सकाळी शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी भाजपाकडून युतीचा प्रस्ताव आला आहे, त्यानुसार आम्ही कामाला लागलो असल्याचंही माध्यमांना सांगितले. पण नेमका कशापद्धतीचा प्रस्ताव होता यावर मौन बाळगले. युती झाली तर सगळीकडे व्यवस्थित व्हावी ही आमची इच्छा आहे. स्वबळाची प्रत्येक पक्षाची तयारी असते, असं सूचक वक्तव्य अनिल देसाईंनी केलं आहे. गेली 20 वर्ष आम्ही सोबत लढलो आहेत. मुंबईकरांनी विश्वासानं निवडून दिलं आहे, त्यामुळे पारदर्शकतेचा वेगळा अर्थ काय हे माहित नाही, असं प्रत्युत्तर देसाईंनी दिले आहे.
काल ठाणे येथे भाजपाची राज्य कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा निर्णय हा पारदर्शी कारभाराच्या आधारावरच घेतला जाईल, असं वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, शिवसेनेबरोबर युती करायचीच असेल तर युतीमध्ये महापौरपद अडीच वर्षे भाजपाकडे हवे असा घाट भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्याकडे घातला आहे. गेले दोन दिवस मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईतील नेत्यांची युतीबाबत मते जाणून घेतली. त्यावेळी महापौरपद आधीच वाटून घ्या, असा आग्रह मुंबईतील नेत्यांनी धरल्याचे समजते. आधी तर हे नेते युतीसाठी राजी नव्हते, शिवसेनेशी चर्चादेखील करू नका, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे वृत्त आहे. पण युतीसाठी सेनेशी चर्चा केली जाईल. राज्यात त्यांच्यासोबत सत्ता चालवायची आहे हेही लक्षात घ्या. चर्चाच नको, ही भूमिका स्वीकारली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.