पुणे - Sharad Pawar on Ajit Pawar ( Marathi News ) काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो, असे सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे. संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्षाला काही महत्त्व असते की नाही? अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलचा मेळावा रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. अगोदर लोकांना ‘ईडी’ हा शब्द माहीत नव्हता. आता ‘ईडी’ हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. ईडीचा गैरवापर फार झाला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दोन वेळा चिन्ह गेले
बैलजोडीवर मी पहिली निवडणूक लढलो. दोनवेळा आमचे चिन्ह गेले आहे. चिन्ह मर्यादित काळासाठी उपयुक्त असते, असे सांगत शरद पवारांनी निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया दिली.
भावनिक आवाहन करण्याचे कारण नाही
मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही, हे मी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये भावनिक आवाहन करण्याचे कारण नाही. बारामतीचे लोक शहाणे आणि समंजस आहेत. वर्षानुवर्षे कोणी काम केले आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली, हे बारामतीकरांनी पाहिले आहे. ते योग्य निर्णय घेतील, अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.
चिन्हाबाबतचा प्रस्ताव पाठविणार
राष्ट्रवादी काँग्रेस ‘वटवृक्ष’ याच चिन्हाची मागणी आयोगाकडे करणार का? या प्रश्नावर पवार म्हणाले, अद्याप चिन्हाबाबत निर्णय घेतलेला नाही. निवडणूक आयोगाने चिन्ह कळविण्याबाबत आम्हाला पत्र पाठवले आहे. आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी त्यांची वेळ घेऊ आणि प्रस्ताव देऊ. तत्पूर्वी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून चिन्हाबाबत निर्णय घेणार आहे.