"भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर शरद पवार समर्थन देणार होते, 'त्या' भेटीगाठी ठरवून झाल्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:03 AM2024-04-26T08:03:04+5:302024-04-26T08:03:59+5:30
भाजपाबरोबर राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर शरद पवार समर्थन देणार होते ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट; २०१७ साली खातेवाटपही ठरले होते.
दीपक भातुसे
सुतारवाडी, रायगड : भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आम्ही सर्व मंत्री आणि आमदारांसह शरद पवारांना भेटायला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. त्या भेटीच्या स्क्रिप्टनुसार आम्ही भाजप-शिंदेंबरोबर मंत्रिमंडळात सहभागी होण्याच्या निर्णयाला शरद पवार समर्थन देणार होते, यात तथ्य आहे. यावर आमचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल अधिक प्रकाश टाकू शकतील, असा गौप्यस्फोट करत २०१७ साली तर आमचे भाजपबरोबरचे मंत्रिमंडळातील खातेवाटपही ठरले होते, असा दावा सुनील तटकरे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
महायुतीच्या जागावाटपात तुमच्या वाट्याला काय आले?
महायुतीच्या जागावाटपावर आम्ही समाधानी आहोत. आमच्या पक्षाचा एकच खासदार असताना आम्हाला पाच जागा मिळाल्या. सातारच्या जागेच्या बदल्यात राज्यसभेची जागा दिली जाणार असून आणखी दोन-तीन गोष्टी ठरल्या आहेत, त्या नंतर सांगू.
तुम्हाला जागा मिळाल्या तरी उमेदवार आयात करावे लागले?
परभणीची जागा सोडली तो त्याग आम्ही केला. त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. उद्धवसेना असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल यातही आयात उमेदवारांचे प्रमाण मोठे आहेच.
छगन भुजबळांना उमेदवारी मिळणार होती, पण त्यांनी माघार घेतली?
भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते जेव्हा निवडणूक रिंगणात असतात तेव्हा त्यांच्या उमेदवारीचा निर्णय लवकर होणे अपेक्षित असते. तो न झाल्याने भुजबळांनी माघार घेतली. पण, आम्ही या जागेवरील दावा सोडलेला नाही.
काँग्रेसचा जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा तुमच्या जाहीरनाम्यात आहे, भाजपचा याला विरोध आहे ?
आमच्या पक्षाला जे वाटते ते म्हणण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही सत्तेवर येणारच आहोत. अशा वेळी महत्त्वाच्या घटक पक्षाबरोबर चर्चेच्या माध्यमातून आम्ही यश मिळवू अशी आशा आहे.
नरेंद्र मोदींनी एका ठरावीक समाजाबद्दल वक्तव्य करून काँग्रेसवर टीका केली आहे, त्याबद्दल काय मत आहे?
पंतप्रधान जेव्हा राजकीय विषयावर धोरण म्हणून बोलतात तेव्हा प्रतिक्रिया देणे योग्य ठरत नाही. पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका सर्वंकष देशाचा विचार करून घेतलेली असते अशी माझी ठाम समजूत आहे.
मुंबई-गोवा हायवे दीर्घकाळ रखडला हे कोकणातील सर्व नेत्यांचे अपयश नाही का?
या हायवेला खरा न्याय एनडीए सरकारने, विशेषकरून नितीन गडकरी यांनी दिला. हा मार्ग दुर्गम, डोंगराळ, अनेक घाटांचा मार्ग आहे. खूप पाऊस पडत असल्याने वर्षातील सहा महिनेच कामाला मिळतात. पण, २०२५ च्या सुरुवातीपर्यंत पळस्पा ते पात्रादेवीपर्यंतचा रस्ता पूर्ण झालेला दिसेल.
शरद पवार बरोबर नाहीत अशी ही आपली पहिलीच निवडणूक असेल?
आम्ही सर्वांनी हा निर्णय खूप चर्चा आणि सारासार विचार करून घेतला. अनेकदा पवार साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये भाजपबरोबर जाण्याचा निर्णय झाला. २०१४ ला आम्ही सरकारमध्ये जाणार होतो. पण, उद्धव ठाकरेंची सेना सरकारमध्ये सहभागी झाली. २०१६ च्या अखेरीस व २०१७ च्या सुरुवातीला आमचे भाजपबरोबर राज्यातील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटप पूर्ण झाले होते. आमची मंत्री संख्या, खाती, पालकमंत्र्यांचे जिल्हे ठरले होते. मला आज कटाक्षाने या बाबी नमूद करायच्या आहेत. २०१७ च्या गणपतीच्या पहिल्या दिवशी मी दिल्लीत होतो. पवार साहेब, अमित शाह आणि अजून एक मध्यस्थ होते, त्यांच्याकडे बैठक झाली. फक्त नितीश कुमारांसारखे करायचे एवढाच विषय आमच्यासमोर होता. याबाबतचा प्रस्ताव मला मांडायला सांगण्यात आला. पण, शाहांनी तत्काळ उत्तर दिले की ‘तटकरेजी शिवसेना रहेगी, आप अंदर आने के बाद यदी शिवसेना को जाना है तो जायेगी, पर हम उनको निकालेंगे नही. क्यू की शिवसेना हमारा पुराना साथी है, वाजपेयी, अडवाणीजीने उनको एनडीए का घटक बनाया है’, असे ते म्हणाले होते. त्यावेळी आम्ही नकार दिला. नाही तर आम्ही २०१७ मध्ये मुहूर्तच काढून गेलो होतो, पितृपक्षाच्या आत सरकारच बनणार होते. यातील एकही वाक्य खोटे नाही. शिवसेनेला बाहेर ठेवण्यासाठी भाजपने पुनर्विचार करावा यासाठी आम्ही त्यांना एक महिना दिला. दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आम्ही स्वतंत्रपणे जाण्याचा निर्णय घेतला.
रायगडची लढाई किती कठीण वाटते?
इथे अनंत गीतेंना सहानुभूती शून्य आहे. २०१४ ला मी निवडणूक हरलो, पण लोकांमध्ये राहिलो. २०१९ ला मोदींची लाट असूनही मी जिंकून आलो. चक्रीवादळ, महापूर या काळात गीते इथे नव्हतेच. २०१४ ला तुमचा पराभव झाला तेव्हा शेकाप तुमच्याबरोबर नव्हता, २०१९ ला ते बरोबर होते तेव्हा विजय झाला. आता ते नाहीत. शेकाप आता संपलेली आहे. कारण १९५२ पासून पहिल्यांदा २००९ साली जयंत पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून शेकापला बाहेर काढले ही त्यांची ऐतिहासिक कामगिरी आहे. आता शेकापचा एकही आमदार नाही. ताकद म्हणण्यासाठी काय आहे. २०१९ साली अलिबागमध्ये त्यांनी मला १७ हजारांचे मताधिक्य दिले. पण चार महिन्यांनी विधानसभेला शेकापचा अलिबागमध्ये पराभव झाला त्याला जयंत पाटील मला कारणीभूत ठरवतात.
भाजपबरोबर सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपले सर्व मंत्री शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. आता आपले खासदार निवडून आल्यानंतर पुन्हा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार का?
आम्ही सत्तेत गेल्यानंतर पवार साहेबांना भेटायला गेलो. प्रदेशाध्यक्ष म्हणून मला राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्षांकडून सूचित करण्यात आले की, मंत्र्यांसह आपण पवार साहेबांना भेटायला जायचे आहे. आधी मंत्र्यांसह भेटलो. परत सांगण्यात आले आमदारांसह भेटायला जायचे आहे. त्याची स्क्रीप्ट कुणाची होती ते माहीत नाही, पण त्याचा शेवट मला सांगितला होता. ‘आम्ही घेतलेल्या निर्णयाला पवार साहेब समर्थन देणार होते,’ यात तथ्य असून, यावर अधिक प्रकाश प्रफुल्ल पटेल टाकू शकतील. कुणी सांगितले आम्ही स्वतः भेटायला गेलो, पण वेळ ठरल्याशिवाय भेटायला जाता येते का? हे दोन्ही बाजूने होते, वन वे नव्हते.