मुंबई – मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर भाजपाकडून करण्यात आलेल्या टीकेनंतर आता मनसेही आक्रमक झाली आहे. अमित ठाकरे नाशिक दौऱ्याहून मुंबईकडे परतताना सिन्नर टोलनाक्यावर त्यांची कार अडवण्यात आली. त्या रागातून मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. त्यावर भाजपाने अशी दादागिरी सहन करणार नाही असं म्हणत अमित ठाकरेंवर निशाणा साधला. त्यातून आता मनसे आणि भाजपा यांच्यावर शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपाने अमित ठाकरेंवर व्हिडिओ बनवल्यानंतर मनसेने प्रत्युत्तर देत अमित ठाकरेंनी इर्शाळवाडी दुर्घटनेवर केलेले विधान इतके झोंबलं की पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ३१ वर्षाच्या तरूणावर तुटून पडलाय. कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण का वाढतंय? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने वार का होत आहेत? बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरू असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? माणसं किड्या मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्यांचे सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत असा आरोप मनसेने केला.
त्याचसोबत मनसेने भाजपाचे जुने ट्विट पुन्हा रिट्विट केरत विसरला नाही महाराष्ट असा हॅशटॅग दिला आहे. त्यात २०१९ मध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्यावरून छगन भुजबळांवर केलेले आरोप, सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार आणि सुनील तटकरे यांना तुरुंगात पाठवू असं विनोद तावडेंनी केलेले विधान, या दोन्ही नेत्यांचा थोर चोर नेते असा उल्लेख केलेल्या भाजपाच्या ट्विटची आठवण करून दिली. भाजपाने २०१९ म्हणजेच ४ वर्षापर्वीच एक चांगली घोटाळ्यांची मालिका मांडली होती असा खोचक टोलाही मनसेने भाजपाला लगावला.
दरम्यान, पंतप्रधानपदी असूनही नरेंद्र मोदींना गुजरातचं हित सर्वोत्तोपरी आहे. मुंबई महापालिकेची स्वायत्तता धोक्यात, पालकमंत्र्यांनी मुंबई मनपात उघडलेले दालन, इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर अमित ठाकरेंनी राज्य सरकारवर केलेली टीका, मणिपूर महिला अत्याचारावरून मनसेने केलेली मागणी यासारख्या विविध मुद्द्यांवरून मनसेने राज्य शासन आणि केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे हा घाव वर्मी बसला अशा हॅशटॅगने मनसेने भाजपावर निशाणा साधला.