अमर गायकवाड
माढा : माढा तालुक्यातील उपळाई (बु़) येथील मीनाक्षी सुदाम गुंड - वागज यांनी वयाच्या चाळिसाव्या वर्षी बारावी परीक्षेत ६५ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाल्या आहेत.
पतीच्या अकाली निधनानंतर घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. मोठ्या जिद्दीने जगत असताना अचानकपणे संसाराचा भार त्यांच्यावर पडला. त्यामुळे नंतर शिक्षण घेणे शक्यच झाले नाही, परंतु अनेक नोकरीच्या संधी शिक्षण पूर्ण नसल्याने हातून जात होत्या. संसाराचा गाडा हाकत सुनेच्या व दोन्ही भावांच्या प्रबळ पाठबळामुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची मनात कुठेतरी खंत वाटत असल्याने दोन वर्षांपूर्वी त्यांनी दहावीची परीक्षा दिली.
चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाल्या. त्यानंतर या वयात पुढचे शिक्षण नको असे म्हणत असताना सून मयुरी गुंड हिच्या इच्छेखातर बारावी परीक्षेसाठी अर्ज केला व मंगळवारी लागलेल्या निकालात चांगल्या गुणांनी त्या उत्तीर्ण झाल्या. संसाराचा गाडा सांभाळत बारावी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल गुंड यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
लोक काय म्हणतील या गोष्टीकडे घरच्या पाठिंब्यामुळे दुर्लक्ष केले. गेल्या २३ वर्षांपासून शिक्षणापासून अलिप्त असल्याने काहीही झाले तरी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवायचे असा निश्चय बाळगला होता. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही यश संपादन होऊ शकते.- मीनाक्षी गुंड-वागज